पाणीकपातीवरून पुन्हा मतभेद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - शहराला सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्यात आणखी कपात टाळण्यासाठी पंधरा दिवसांतून एकदा म्हणजे महिन्यात दोनदा पाणीपुरवठा बंद (क्‍लोजर) ठेवण्याचा पर्याय महापालिकेकडून जलसंपदा विभागापुढे मांडण्यात आला आहे; तर महिन्यातून दोनऐवजी आठवड्यातून एकदा पाणीकपात करावी, असा पर्याय जलसंपदा विभागाने सुचविला आहे. यावर एकमत न झाल्याने पाणीकपातीवरील चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरू आहे. 

पुणे - शहराला सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्यात आणखी कपात टाळण्यासाठी पंधरा दिवसांतून एकदा म्हणजे महिन्यात दोनदा पाणीपुरवठा बंद (क्‍लोजर) ठेवण्याचा पर्याय महापालिकेकडून जलसंपदा विभागापुढे मांडण्यात आला आहे; तर महिन्यातून दोनऐवजी आठवड्यातून एकदा पाणीकपात करावी, असा पर्याय जलसंपदा विभागाने सुचविला आहे. यावर एकमत न झाल्याने पाणीकपातीवरील चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरू आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

जिल्हा नियोजन समितीच्या कामाकाजासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीपूर्वी त्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयात चर्चा केली. महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, विपीन शर्मा, पाटबंधारे विभागाचे पांडुरंग शेलार आदी उपस्थित होते. 

शहराला दररोज 1150 एमएलडी पाणीपुरवठा केल्यास पाण्याचे सध्याचे वेळापत्रक कोलमडणार आहे. शहरात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने पाणीकपात टाळण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांतून एकदा म्हणजे महिन्यातून दोनदा बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून किती पाण्याची बचत होऊ शकते, याबाबत महापालिकेकडून या बैठकीत माहिती देण्यात आली; तर महिन्यातून दोनदा पाणीकपात करून फारसा उपयोग होणार नाही. आता पाण्याची बचत केली नाही, तर मार्च ते मे या तीन महिन्यांत पाण्याची परिस्थिती बिकट होऊ शकते. आठवड्यातून एकदा पाणीकपात केली, तर पुढे अडचण येणार नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावर मार्च ते मे या तीन महिन्यांत गरज पडल्यास आठवड्यातून एकदा पाणी बंद ठेवता येईल; परंतु सध्या आहे तेवढा पाणीपुरवठा सुरू ठेवावा, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. पर्वती जलकेंद्र ते लष्कर जलकेंद्र यादरम्यान बंदिस्त पाइपलाइन झाल्यामुळे शंभर एमएलडी पाण्याची बचत होणार आहे, असेही महापालिकेकडून निदर्शनास आणून देण्यात आले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यावर माहिती जमा करण्याचे आदेश पालकमंत्री बापट यांनी दिले. मात्र पाणीकपातीबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. 

पाणीपट्टीचे 42 कोटी देण्याचा निर्णय 
पाटबंधारे खात्याला महापालिकेने पाणीपट्टीचे 42 कोटी रुपये ताबडतोब देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर या महिन्याच्या अखेरीस पाणीपट्टीचे साडेसात कोटी रुपये देण्याचेही ठरले; तर बेबी कॅनॉलचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी किमान 21 दिवस हा कॅनाल बंद ठेवणार आहे. या कॅनॉलच्या कामासाठीची निविदा काढली आहे. केवळ वॅर्क ऑर्डर काढणे बाकी आहे, ती काढल्यानंतर लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येईल, असे जलसंपदा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

Web Title: Water cutting issue in pune