भामा आसखेड धरणातून पुन्हा विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

भामा आसखेड धरण या वर्षी अल्पावधीतच शंभर टक्के भरले आहे. गुरुवारपासून धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मागील पंधरवड्यात झालेल्या दमदार पावसाने धरण भरले होते. त्यानंतर विसर्ग सुरू करण्यात आला. परंतु, मागील आठ ते दहा दिवसांपासून धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने विसर्ग बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा पाऊस पडत असल्याने धरणातून सध्या 553 क्‍युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.

आंबेठाण (पुणे) : भामा आसखेड धरण या वर्षी अल्पावधीतच शंभर टक्के भरले आहे. गुरुवारपासून धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मागील पंधरवड्यात झालेल्या दमदार पावसाने धरण भरले होते. त्यानंतर विसर्ग सुरू करण्यात आला. परंतु, मागील आठ ते दहा दिवसांपासून धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने विसर्ग बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा पाऊस पडत असल्याने धरणातून सध्या 553 क्‍युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.

धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून पाणी सोडण्यात येत असून, त्यासाठी दरवाजे 10 सेंटिमीटरने उचलण्यात आले आहेत. खेड तालुक्‍यासह शिरूर आणि दौंड तालुक्‍याला पाण्याचा फायदा होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरण लवकर भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाणी सोडण्यात आल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 1 जूनपासून धरणात 1341 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. भामा आसखेड हे खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवणक्षमता 8.14 टीएमसी इतकी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या दोन दरवाजातून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. धरणातून सकाळी आठ वाजल्यापासून 553 क्‍युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.

नदीकाठच्या गावांनी सावधानतेचा इशारा
आजपर्यंत भामा आसखेड धरण परिसरात 1341 मिलिमीटर पाऊस झाला आहे. बुधवार सकाळपासून गुरुवारी सकाळी सहापर्यंत 4 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून पाऊस असाच सुरू राहिला, तर विसर्ग अजून वाढवावा लागेल, असे धरण प्रशासनाच्या वतीने भारत बेंद्रे आणि के. डी. पांडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन भामा आसखेड धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Dicharge From Bhama Askhed Dam