पावसाचा थेंब न थेंब जिरतोय

Save-Water
Save-Water

पौड रस्ता - धो-धो पडणारे पावसाचे पाणी ड्रेनेजमध्ये वाहून जात होते, याचे मनाला दुःख व्हायचे. परंतु, आमच्या सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारला आणि पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरतोय, याचे समाधान वाटत असल्याची भावना दामोदर रेसिडेन्सी सोसायटीचे अध्यक्ष मोहन मोने यांनी व्यक्त केली. अशीच भावना कोथरूडमधील विविध सोसायटीच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी मांडली.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सुमारे पंचेचाळीस सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यामुळे या सोसायट्यांचा पाण्यावर व विजेवर होणारा बराचसा खर्च वाचणार आहे. 

पाणीटचाईच्या काळात बोअरचे पाणी पण कमी पडत असल्याने अनेक सोसायट्यांना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पाण्याचा खर्च वाढल्यामुळे अनेक सोसायट्या मेटाकुटीला आल्या होत्या. त्यातच सरकारने रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम सुरू केला. आमदार मेधा कुलकर्णी यांनी याकामी पुढाकार घेतला.

आयडियल पार्क सहकारी गृहरचना संस्थेचे अध्यक्ष ॲड. उदय रबडे म्हणाले, की आमच्या सोसायटीत १६ दुकाने व ६४ निवासी सदनिका आहेत. दहा हजार चौरस फुटांची आमची गच्ची आहे. त्यावर पडणारे पावसाचे पाणी पाच पाइपच्या साह्याने भूगर्भात जिरवण्याचा उपक्रम आमदार फंडातून आम्ही केला. 

सोसायटीच्या बोअरवेलची क्षमता त्यामुळे वाढण्यास मदत होईल. ३७० लाख लिटर पाणी यातून उपलब्ध होईल, असा भूजल तज्ज्ञांचा अंदाज आहे. परंतु, यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे आम्हाला जास्त पाणी उपलब्ध होईल, याची खात्री आहे.

आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, की टंचाईच्या काळात अनेक सोसायट्यांना पाण्याच्या टॅंकरवर अवलंबून राहावे लागते. बोअरवेलचे पाणी वापरणाऱ्या सोसायट्यांनासुद्धा दिवसेंदिवस पाणी कमी होत असल्याचा अनुभव येत होता. 

पावसाचे पाणी वाया जाण्यापेक्षा ते भूगर्भात साठवता यावे, यासाठी ठोस कार्यक्रम राबवणे आवश्‍यक होते. त्यासाठी आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यासाठी सोसायट्यांनी सहभागी व्हावे म्हणून विशेष मोहीम राबवली. त्याला यश मिळत असल्याचा आनंद होत आहे.

अभिशिल्प सोसायटी, पिनाक सदिच्छा, कल्पवृक्ष सोसायटी, गंधार सोसायटी, आयडियल पार्क, सदाफुली बी अपार्टमेंट, दामोदर रेसिडेन्सी आदी गृहरचना संस्थांमध्ये हे  प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com