Video : बोपोडीत 30 घरात शिरले पाणी;100 जण पडले घराबाहेर

पांडुरंग सरोदे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

- मुळा-पवना नदीच्या पाणी पातळी वाढली
- रविवारी सकाळपासून बोपोडीतील छाजेड पेट्रोल पंपामागील झोपडपट्टीतील 25 ते 30 झोपडयात पाणी शिरले.
- 100 हून अधिक नागरिक स्वत: बाहेर पडले.
- एका घरात पाणी शिरल्यामुळे अडकलेल्या चौघांची अग्निशामक दलाने सुटका केली. - तीन महिने व दोन वर्षाच्या बाळासह सासु-सुनेचा समावेश होता.

पुणे :  मुळा-पवना नदीच्या पाणी पातळी वाढल्यामुळे रविवारी सकाळपासून बोपोडीतील छाजेड पेट्रोल पंपामागील झोपडपट्टीतील 25 ते 30 झोपडयात पाणी शिरले. त्यातील 100 हून अधिक नागरिक स्वत: बाहेर पडले. मात्र, एका घरात पाणी शिरल्यामुळे अडकलेल्या चौघांची अग्निशामक दलाने सुटका केली. त्यामध्ये तीन महिने व दोन वर्षाच्या बाळासह सासु-सुनेचा समावेश होता.

पिंपरी-चिंचवडमधून पुढे जाणाऱ्या मुला व पवना या दोन्ही नद्याच्या पाणी पातळीमध्ये शनिवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने नदीकिनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. दरम्यान, बोपोडीतील भाऊ महाराज रस्त्यावरील छाजेड पेट्रोल पंपाच्या मागील बाजुस असलेल्या झोपडपट्टीमध्ये रविवारी सकाली पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी स्वत: कुटुंबासह संसारपयोगी वस्तु घेऊन सुरक्षित स्थलावर जाण्यास प्राधान्य दिले. 

दरम्यान, याच झोपडपट्टीमध्ये नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या शेख कुटुंबाने पाणी घरामध्ये शिरणार नाही, म्हणून घरात राहन्यास प्राधान्य दिले. मात्र सकाळी नऊ वाजता घरात पाणी शिरु लागले. स्थानिकांनी याबाबत अग्निशामक दलास खबर दिली. त्यानंतर जवानानी शेख कुटुंबास सुरक्षितरीत्या बाहेर काढले. त्यामध्ये जिआन मेहबुब शेख (वय 3 महीने), अजान मेहबुब शेख (वय 2 वर्ष), त्यांची आई आलिया मेहबुब शेख (वय 24) व सासु खाशिदी अब्दुल शेख (वय 52) यांचा समावेश आहे.

कसबा अग्निशामक केंद्रचे तांडेल विकास सितायकर, फायरमन कमलेश चौधरी, सुरेश पवार, संतोष अरगडे, राजू शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Flows in 30 houses at Bopodi