#WaterIssue पावसानंतरही आंबेगाव तहानलेलेच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पुण्यातील धरणे भरून शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र दुसरीकडे पुणे महानगरपालिकेत नवीन समाविष्ट गावात नागरिकांचे पुरेशा पाण्याअभावी होणारे हाल अद्याप थांबले नसून, दोन वर्षांपूर्वी पालिकेत येऊनही आंबेगाव परिसरातील बहुसंख्य भाग अजूनही तहानलेलाच आहे.

जांभूळवाडी - यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पुण्यातील धरणे भरून शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र दुसरीकडे पुणे महानगरपालिकेत नवीन समाविष्ट गावात नागरिकांचे पुरेशा पाण्याअभावी होणारे हाल अद्याप थांबले नसून, दोन वर्षांपूर्वी पालिकेत येऊनही आंबेगाव परिसरातील बहुसंख्य भाग अजूनही तहानलेलाच आहे.

आंबेगाव खुर्दमध्ये जांभूळवाडी रस्त्यावरील मोडकवस्ती, दळवीनगर, सिद्धिविनायक सोसायटी, विठ्ठलनगर, विवा सरोवर तसेच आंबेगाव बुद्रुकमधील तुकारामनगर, नऱ्हे रस्ता व सिंहगड महाविद्यालय रस्ता परिसरात नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या भागात मोठमोठ्या सोसायट्या आहेत. महिलांना लांबून पाणी आणणे शक्‍य नसल्याने संध्याकाळी पुरुष आपल्या गाडीवरून पिण्याचे पाणी वाहून आणण्याचे काम करताना दिसतात. महानगरपालिका समाविष्ट भागातून पाणीपट्टी वसूल करते. पण अनेक भागांत पाण्याची लाइनही टाकलेली नाही. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत. पाणीसमस्या कायमची मिटवावी अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

आचारसंहितेनंतर सर्व भागांत पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत मागणी असेल तिथे पालिका टॅंकरने पाणीपुरवठा करत आहे.
- सुनील अहिरे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग 

काही भागांत पालिकेने पाणी दिलेले नसतानाही तेथून पाणीपट्टी वसूल केली जाते. या प्रश्‍नी आयुक्तांची भेट घेतली असता लवकरच या भागात पाण्याची सोय करू, असे आश्‍वासन देण्यात आले.
- अनिल कोंढरे, आंबेगाव बुद्रुक 

महापालिका पाच ते आठ दिवसांत केवळ एक टॅंकर देते. आम्हाला रोज पाच टॅंकर पाणी लागते. त्यामुळे पाण्याची व्यवस्था आमची आम्ही करतो. प्रसंगी भांडी घेऊन इतरत्र फिरून पिण्याचे पाणी भरतो.
- दत्ता रोकडे, तुकारामनगर, आंबेगाव बुद्रुक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Issue ambegaon water shortage