
गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी या गावांचा महापालिकेत समावेश होऊन दोन वर्षे होऊन गेली. मात्र, अद्याप याठिकाणी पाण्यासाठीची आहे तीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.
Water Issue : पुणे महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये पाण्यासाठी वणवण
कात्रज - गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी या गावांचा महापालिकेत समावेश होऊन दोन वर्षे होऊन गेली. मात्र, अद्याप याठिकाणी पाण्यासाठीची आहे तीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची कायम पाण्यासाठी वणवण होत आहे. या भागातील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल होत असून, परिसराचा महापालिकेत समावेश होऊनही नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.
पाणी, ड्रेनेज, कचरा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक हे प्रश्न महापालिकेत समावेश झाल्यानंतर सुटतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, दक्षिण पुण्यातील गावे अद्याप तहानलेलीच आहेत. पायाभूत सुविधांसाठीही महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. या भागाचा महापालिकेत समावेश असल्याने रहिवाशांना महापालिकेचा कर भरावा लागत आहे. मात्र, पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून वंचित रहावे लागते. मागील वर्षापासून महापालिकेकडून ठेवण्यात आलेल्या टाक्यांमध्ये टँकरने पाणी सोडण्यात येते. त्यानंतर या ठिकाणांवरून नागरिकांना पाणी घेऊन जावे लागत असल्याने आम्ही कर का भरायचा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
या टाक्यांमध्ये टँकरद्वारे येणारे पाणीही कधी-कधी दिवसाआड येत असून, त्याची निश्चित अशी वेळ नसते. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत असून समाविष्ठ गावांकडे महापालिकेने आजपर्यंत सातत्याने दुर्लक्ष केलेले आहे. पाण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
प्रतिक्रिया
गावातील विकासकामे ही ग्रामपंचायत स्तरावर केली जात असत. परंतु गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर नागरिकांना समस्या कोणाकडे मांडाव्या याचे कोडे पडले आहे. अनेकांच्या महापालिकेकडून कामे होत नसल्याची तक्रारी आहेत.
- व्यंकोजी खोपडे, माजी संरपंच, गुजर-निंबाळकरवाडी
महापालिकेत जाऊन तीन पट कर भरण्यापेक्षा ग्रामपंचायत होती तेच बरे होते. गावकऱ्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे यावरती कायमस्वरूपी तोडगा निघायला हवा. पाणीपट्टी आकारून सोयी मात्र मिळत नसतील तर गावच बरं होतं हेच म्हणावे लागेल.- विक्रम भिलारे, भिलारेवाडी
ग्रामपंचायतीच्या जुन्या पद्धतीने आम्ही पाणीपुरवठा करत आहोत. मात्र, नवीन पाण्याच्या वाहिन्या टाकण्यासाठी डीपीआर तयार करण्यासारख्या गोष्टींवर काम सुरु असून महापालिकेकडून ठोस उपाययोजना करण्याबाबत येणार आहे. त्यामुळे वेळ लागत आहे.
- अतिश जाधव, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा