#WaterIssue कोथरूड, सिंहगड परिसरात कुठे धो-धो, कुठे थेंब-थेंब

Water-Issue
Water-Issue

पुणे - यंदा तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लॉ कॉलेज परिसर, गोखलेनगर, जनवाडी, पौड रस्ता, वारजे पठार, बावधन बुद्रुक, भूगाव व शिवण्यातील देशमुखवाडी, राहुलनगर, धायरी, नऱ्हे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तर कर्वेनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत भागातील परिस्थिती उलट आहे. येथे पुरेशा प्रमाणात पाणीपुरठा होत आहे. त्यामुळे काही भागांत कुठे धो-धो तर कुठे थेंब-थेंब अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

गोखलेनगर
लॉ कॉलेज रस्ता भागात टॅंकरने पाणीपुरवठा
शिवाजीनगर भागात मोटारीद्वारे उपसा
डेक्कन जिमखाना सखल भाग असल्याने पुरेसा पाणीपुरवठा
गोखलेनगरमध्ये कमी दाबाने पाणी 
गोखलेनगरमध्ये सकाळी पाणी सोडण्याची मागणी
जनवाडीत अवेळी पाणी येत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह महिला त्रस्त
पांडवनगरमध्ये पाइपलाइन फुटून पाणी वाया जाण्याचे प्रमाण वाढले
वडारवाडीत कमी दाबाने; परंतु पुरेसे पाणी
बहिरटवाडी परिसरात सार्वजनिक नळावर पाण्यासाठी रांगा

बावधन 
भूगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील पाणीसाठ्याची पातळी खालावली 
बंधाऱ्यातील खासगी कृषिपंप बंद करण्याची भूगाव ग्रामपंचायतीची मागणी 
पिण्याच्या पाण्यासाठी भूगावकरांची पुण्याकडे धाव
बावधनमधील राम नदी कोरडी  
कपडे, भांडी धुण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे दुर्भिक्ष 
बावधन बुद्रुकच्या नागरिकांना बावधन खुर्दच्या नागरिकांकडून पाणी विकत घेण्याची वेळ 

कोथरूड 
कोथरूड, कर्वेनगर भागामध्ये पाणीपुरवठा कमी-अधिक प्रमाणात सुरू
दर गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात
शुक्रवारी, शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा
सोसायटीतील टाक्‍या भरत नाहीत
जलवाहिनी फुटल्याने अनेकवेळा पाणीपुरवठा विस्कळित 

शिवणे
प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा कमी दाबाने 
पालिकेऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पुरवठा
शिवणेची लोकसंख्या वाढल्याने पुरवठा विस्कळित 
१६ ऐवजी २४ तास वीजपंप सुरू ठेवावा लागतो
देशमुखवाडी, गावठाण, राहुलनगर, कामठेवस्ती,
शिंदे पूल, दांगट पाटील नगर, विष्णू मालती इंडस्ट्री परिसर, दांगटवस्ती परिसरात पुरवठा कमी
पालिका हद्दीतील वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रलंबित

वारजे  
पठारावर तसेच डोंगराच्या भागांमध्ये पाण्याचे प्रमाण अतिशय कमी
दुपारी पाणी येत असल्याने पठारावरील नागरिकांची गैरसोय
सोसायटीच्या काही भागांत मुबलक पाणीपुरवठा 
महामार्गालगतच्या उजवीकडच्या भागात तेजोवले सोसायटीत चार दिवसांपासून पाणी कमी 
न्यू अहिरे गावात दिवसातून एकच तास पाणी येते 
रामनगर भागामध्ये काही ठिकाणी पाणी भरपूर, तर काही ठिकाणी पाणी कमी प्रमाणात 

पौड रस्ता
कर्वे पुतळा चौकातील राहुलनगर येथे शुक्रवारी नादुरुस्त व्हॉल्व्हमुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती
नागरिकांनी तक्रार केल्यानंतर शनिवारी त्याची दुरुस्ती करण्यात आली
आठवले चौकात विकासकामे करताना  बऱ्याचदा जलवाहिन्या तुटून पाणीगळती 
सिंहगड रस्ता 
आनंदनगर, माणिकबाग, हिंगणे, विठ्ठलवाडी,
राजाराम पूल, जुना जकात नाका, नवशा मारुती,
गणेशमळा, पानमळा, दत्तवाडी या भागांत दररोज एक वेळ पाणी 
दत्तवाडी परिसरात सायंकाळी पाणी येते; ते रात्री उशिरापर्यंत असते 
जनता वसाहत भागातील काही भागांत सकाळी, तर काही भागांत संध्याकाळी पाणी येते
सिंहगड रस्ता परिसरातील सर्व भागांत वेगवेगळ्या वेळी नियमित पाणी येते
नवशा मारुती मंदिर परिसरात काही ठिकाणी पाण्याची समस्या होती 
जुना जकात नाका परिसरात व्हॉल्व्ह बसविल्यानंतर पाणी समस्या सोडविण्यात आली  
सिंहगड रस्ता भागातील सोसायट्यांनी पाण्याचे नियोजन केल्याने पाण्यासंदर्भात अडचणी नाही 

धायरी 
धायरी गाव व परिसरात दिवसाआड पाणी, तर काही भागांत आठवड्यानंतर पुरवठा 
नऱ्ह्यात भूमकर वस्ती, इंगळेवस्ती, मानाजीनगर, अभिनव कॉलेज परिसर, श्री कंट्रोल चौक, 
पारी कंपनी परिसरात तीव्र टंचाई
धायरी गाव, रायकरमळा, सीताईनगर,
बेनकरवस्ती, डीएसके विश्‍व, गणेशनगर, 
दळवीवस्ती, आंबाईमाता रस्ता, विजयनगर या परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा
बेनकरवस्ती भागात अर्धा तास पाणीपुरवठा
ज्या विहिरीमधून धायरी गावाला पाणीपुरवठा केला जातो; त्या विहिरीमधील विद्युत पंप गेल्या आठ दिवसांपासून बंद होते. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा झाला
परिसरातील नागरिकांचा विकतचे पाणी घेण्यामागे कल

नागरिकांच्या प्रतिक्रिया
आमच्या भागात कमी दाबाने पाणी येते. गुरुवारी पाणी आले नाही, तर शुक्रवारी टॅंकर मागवावा लागतो. परिसरात नवीन इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे.
- डॉ. अर्पणा गोसावी, शांतिशीला सोसायटी, लॉ कॉलेज रस्ता

माझ्या घरी कमी दाबाने पाणी येते. काही नागरिक मोटार लावून पाणी घेतात. हा नेहमीचा प्रश्न झाला आहे. 
- अक्षता गायकवाड, पाटबंधारे सोसायटी, ज्ञानेश्वर पादुका चौक

आम्ही सखल भागात राहतो. त्यामुळे पाणी पुरेसे येते. कमी दाबाने पाणी आले, तरी विनाकारण जास्त पाणी वापरत नाही. झाडांना, कार पुसण्यासाठी पाणी प्रमाणात वापरतो. काटकसरीने पाणी वापरले, तर कमी पडणार नाही.
- गीता भुर्के, गंगातारा सोसायटी, डेक्कन जिमखाना

आमच्याकडे संध्याकाळी पाणी येते. त्यामुळे आमची धावपळ उडते. पाण्याची वेळ बदलावी. सकाळी पाणी सोडले, तर महिलांना घरातील काम करण्यासाठी सोपे जाईल. 
- राधा पांगारे, गोखलेनगर

पूर्वी दुपारी ४ ते ८ या वेळेत पाणी येत होते. सध्या रात्री ८ ते १२ या वेळेत येते. कमी दाबाने पाणी येते. आमच्या भागाकडे नगरसेवकांचे लक्ष नाही. आम्ही राहतो तो उंच भाग आहे. खाली मोटार लावून पाणी उपसले जाते.
- जयवंत दौंडकर, जनवाडी

या भागात मागील महिनाभरापासून पाण्याची परिस्थिती बरी आहे. पण, पाण्याची वेळ बदलावी. परंतु, काही ठिकाणी प्रशासनाने वाहिनी दुरुस्त करून वाहते पाणी थांबवावे.
- योगिता कांबळे, पांडवनगर

संध्याकाळी आमच्याकडे कमी दाबाने पाणी येते. सध्या तरी पुरेसे पाणी आहे.
- सोनिया मुंढे, जुनी वडारवाडी

सार्वजनिक नळ असल्याने पाणी भरण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. जुनी पाइपलाइन असल्याने कमी दाबाने पाणी येते. संध्याकाळी ७, ८, ९ या कालावधीत पाणी केव्हाही येते.  त्यामुळे पाणी भरण्यासाठी जागावे लागते. कधी कधी दोन-तीन घागरी पाणी मागून आणावे लागते.
- दीपाली आहेरराव, सर्व्हे नं. १०३, बहिरटवाडी

पाणी नियमित नसल्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. जेवणासाठी, भांडी आणि कपडे धुण्याकरिता पाणी कमी पडत आहे.
- सारिका शिंदे, रायकरमळा

आम्ही ग्रामपंचायतीला कर भरतो, तरी आम्हाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. 
- जीवन माने, नऱ्हे

दुरुस्तीच्या नावाने कोथरूड भागात पाणीकपात केली जात आहे. यामुळे आठवड्यातील दोन ते तीन दिवस आम्हाला पाणी समस्येचा सामना करावा लागतो.
- जयश्री देशपांडे, कोथरूड

एक वेळ गुरुवारी पाणी बंद ठेवले तर ठीक आहे. पण, शुक्रवारी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा झालाच पाहिजे. नियोजनाचा अभाव असल्यानेच हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- नरेंद्र कुलकर्णी, एरंडवणे
  
आता पाणीपुरवठा पुरेशा दाबाने सुरू आहे. परंतु, भविष्यातील पाणीकपातीचे संकट कायम डोक्‍यावर आहे. पाच वर्षांपूर्वी अशीच पाणीकपात महापालिकेने लादली होती. ती केवळ प्रशासकीय हलगर्जीमुळेच; आता तरी नियोजन करण्यात यावे.
- अदिती पासलकर, कर्वेनगर

शिवणे गावच्या अर्ध्या भागाला पाणी कमी दाबाने मिळत आहे. दांगट पाटील नगर, विष्णू मालती इंडस्ट्री परिसर, दांगटवस्ती हा परिसर पाणी योजनेचा शेवटचा भाग असल्याने येथे कमी दाबाने पाणी मिळते. एका तासाऐवजी अर्धा तासच पाणी मिळते. दाब पण कमी असतो. उन्हाळ्यात सोसायटीतील बोअरचे पाणी कमी झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. 
- ममता दांगट, शिवणे 

प्राधिकरणाचा पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होतो. बोअरचा पाणीसाठा संपल्याने सोसायट्यांना टॅंकरने पाणी मागवावे लागत आहे. 
- संगीता हिवाळे, शिवणे 

आमच्या सोसायटीमध्ये गुरुवारपासून पाणी येत नाही. यासंदर्भात आम्ही पाणीपुरवठा विभागाला अनेक वेळा संपर्क साधला; मात्र दाद मिळत नाही.
- निवृत्ती येनपुरे,  तेजोवलय सोसायटी, वारजे 

गोकूळनगर पठारावर पाणी अतिशय कमी दाबाने येत आहे. अनेक नागरिक दुपारी कामावर असल्याने पाणी भरणे अवघड होते आणि पाण्याचा दाबही कमी असल्याने पाणी भरण्यासाठी रांग लावावी लागते.
- भाग्यश्री खंदारे, सोनाली माने, वारजे 

रामनगर भागात काही ठिकाणी पाणी कमी येत आहे. त्यासाठी आम्हाला दुसऱ्यांच्या नळावरून पाणी भरावे लागते.
- सविता लोयरे, रामनगर 

झोपडी भागात भरपूर व २४ तास पाणी असते, असा अनेकांचा गैरसमज आहे. आता आमच्याकडे एकवेळच पाणी येते. त्यामुळे कामाला जाण्यापूर्वी धुणीभांडी करून जावे लागते. 
- सुरेखा जोरी, जय भवानीनगर

मेगासिटीमध्ये साठवण टाकीत पुरेसे पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. येथे सहा मजली इमारती आहेत. येथील लिफ्टही अनेक वर्षांपासून बंद आहेत. पाणी आणण्यासाठी खाली यावे लागते. सहा मजले चढून पाणी नेणे आम्हाला अवघड जाते. तक्रार करूनही उपयोग होत नाही. पुरेशा दाबाने पाणी मिळावे, अशी आमची मागणी आहे. 
- सुरेखा जाधव, पौड रस्ता 

आमच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणीगळती होते. त्यामुळे पाणी वाया जाते. यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
- विकास बोरकर, पौड रस्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com