#WaterCrises पाण्यावरून पोरखेळ 

#WaterCrises पाण्यावरून पोरखेळ 

पुणे - पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभागात पोरखेळ सुरू असल्याचे गुरुवारी (ता. 22) पुन्हा एकदा स्पष्ट झाले. जलसंपदा विभागाने सायंकाळी चार वाजता खडकवासला जॅकवेलमधील एक पंप बंद केला. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाची पळापळ झाली. अखेर जलसंपदामंत्री आणि सचिवांशी महापालिका प्रशासनाने संपर्क साधल्यानंतर जलसंपदा विभागाकडून रात्री दहा वाजता हा पंप पुन्हा सुरू करण्यात आला. 

कमी पाऊस झाल्याने खडकवासला धरणसाखळीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा असल्याचे कारण देत मागील महिन्यांत मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये पुणे महापालिकेला कराराप्रमाणे 1150 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यंतरी खडकवासला धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बसविलेल्या तीन मोटारींपैकी एक मोटार महापालिकेला कुठलीही कल्पना न देता बंद केली होती. परिणामी ऐन दिवाळीच्या तोंडावर पुणे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. संपूर्ण शहरात त्याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर आले असताना सत्ताधारी पक्षाने त्यांची भेट घेतली. त्यावर शहराला दररोज 1350 एमएलडी पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. 

त्यानुसार शहरातील सर्वच भागांत दिवसातून एकवेळ, परंतु सलग पाच तास पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक महापालिकेकडून तयार करण्यात आले. मात्र त्यांचे नियोजनही कोलमडले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत पर्वती ते लष्कर जलकेंद्रादरम्यानच्या जलवाहिनीचे काम करण्यात येईल. यामुळे सुमारे दीडशे एमएलडी पाण्याची बचत होईल. तूर्तास 1350 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात यावा. त्यानंतर 1150 एमएलडी पाणीपुरवठा करावा, असे पत्र पाटबंधारे विभागाला दिले होते. परंतु, दिवाळी संपल्यानंतरही जलवाहिनीचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिकेच्या पत्राचा आधार घेत दुपारी खडकवासला धरण जलकेंद्रातील एक पंप बंद केला. 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि सचिवांशी महापालिका आयुक्तांनी संपर्क साधला. त्यांना विनंती केल्यामुळे जलसंपदा विभागाकडून पुन्हा पंप सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात होणार नाही. 
- मुक्ता टिळक, महापौर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com