खडकवासला ते हडपसरपर्यंत बोगद्याने पाणी हाच पर्याय 

खडकवासला ते हडपसरपर्यंत बोगद्याने पाणी हाच पर्याय 

पुणे शहराच्या मध्यवस्तीतून मोठ्या मातीच्या कालव्याद्वारे पाणी वाहने सद्यःस्थितीत एक भीषण आणि भयाण प्रयोग झाला आहे. कालवा फुटीनंतर आता काही तरी पर्याय काढणे ही काळाची गरज झाली आहे 

१९६२ सालापासून आजतागायत, कार्यकारी अभियंता ते सचिव या पदावर काम करीत असताना जवळ जवळ अकराशे लहान, मध्यम व मोठी धरणे बांधकाम- देखभाल व जलवितरणाचा जो अनुभव आला त्यातून एक महत्त्वाची बाब लक्षात आली, ती म्हणजे पूर्वनियोजनाची. त्या प्रमाणे काम करण्याची जिद्द, चिकाटी व प्रचंड इच्छाशक्ती याची नितांत आवश्‍यकता असते. अलीकडील खडकवासला कालवा फुटी किंवा एखाद्या भूकंपानंतर किती जीवित हानी झाली अथवा किती वित्त हानी झाली किंवा भूकंप किती रिश्‍टर स्केलचा होता ही माहिती होणे जितके तातडीचे तितकीच तातडी ही जागेवर करावयाची कार्यवाही आणि दूरगामी उपाय योजना, नियोजन व त्या प्रमाणे कार्यपूर्ती यांची असते. 

दुर्दैवाने यापैकी उत्तरार्धाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसते. बराच काळ तू-तू, मी-मी मध्येच जाताना दिसतो. सद्यस्थितीत पुणे शहराचा समावेश हा आपल्या देशाच्या गंभीर भूकंप प्रवण क्षेत्र चार मध्ये ( Zone IV) तर हिमालय, राजस्थान झोन हा अतिगंभीर अशा ५ मध्ये ( Zone V) होतो. अशा क्षेत्रामध्ये गगनचुंबी इमारती या भूकंपरोधक डिझाईन करणे आवश्‍यक आहे. दुर्दैवाने असा कायदा अजून आपल्या देशात झालेला नाही, मात्र चर्चा तेवढी होत असते. 

या लेखाचा मुख्य उद्देश कालवा फुटीपासून वाचण्यासाठी दूरगामी कोण-कोणत्या उपाय योजना करता येतात याबाबत आहे. सुदैवाने कालवा हा सारसबागेकडून येताना पेट्रोलपंपाच्या अलीकडे फुटला. पेट्रोलपंपाच्या पुढील भागात मात्र फार मोठा भराव आहे. त्यावरून, कालव्यावरील लोखंडी पुलावरून लोक ये-जा करतात. तो फुटला असता तर थेट टिळक चौक म्हणजे अलका थिएटरपर्यंत पाणी घुसले असते. ही बाप्पाची कृपाच म्हणायची. 

अगदी थोडक्‍यात, ढोबळमानाने सध्या काय जलवितरण व्यवस्था आहे हे थोडक्‍यात समजून घेणे महत्त्वाचे. टेमघर, वरसगाव, पानशेत धरणांमधून पाणी खडकवासला धरणात एक पिकअपवेअर म्हणून सोडण्यात येते. बऱ्याच वेळा त्यात साठा कमी झाला म्हणजे पुण्याला पाणी कमी कमी असा अवाजवी विचार होताना दिसतो त्या साठी हा खुलासा. १९९९ सालापूर्वी हजारो मंडळी सकाळी प्रातर्विधीसाठी कालव्याचा वापर करीत. ते पाणी नंतर कालव्यातून पर्वती जलकेंद्रात येत असे. हे टाळण्यासाठी बिबवेवाडी येथे पुनर्वसन करण्यात आले. परंतु, नंतर त्यांनी आपली कालवा परिसरातील घरे भाडेपट्ट्याने दिल्याने, या पुनर्वसनाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला. माणूस सहसा एकदम नवीन ठिकाणी स्थलांतरित होण्यास सहजासहजी तयार होत नाही, हेही तितकेच खरे. हा अनुभव लक्षात घेऊन, पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी उंच व पक्‍क्‍या इमारती बांधून कसे करता येईल हे भविष्यात पाहावे लागेल. 

बोगदा पुढे कालव्याला जोडा 
यावर एक उपाय आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या योग्य वाटतो तो म्हणजे संपूर्ण पुणे शहर आणि कॅंटोन्मेंट भागात जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणे हे एक आणि दुसरे म्हणजे संपूर्ण कालवा खडकवासला धरणातून बोगद्याने जमिनीखालून थेट हडपसरपर्यंत घेऊन जाणे हा होय. पुढे हा बोगदा मूळ कालव्याशी जोडता येईल. या पर्यायाचे प्राथमिक सर्वेक्षण १९९३ पासूनच चालू झाले आहे. मी त्या वेळी मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होतो. 

दरवर्षी तीन हजार कोटींची बचत 
खडकवासला ते हडपसर बोगदा केल्यास बाष्पीभवनामुळे उडून जाणाऱ्या अडीच ते तीन टी.एम.सी. पाण्याची बचत होईल. त्याची किंमत दरवर्षी टॅंकरच्या हिशोबाने तब्बल अडीच ते तीन हजार कोटी रुपये होते. 
* १.० टी.एम.सी.= १०००,०००००० घनफूट पाणी होय. 
* म्हणजेच ८ हजार लिटरचे = ३५ लाख ३९५७२ टॅंकर होत. 
* ३ हजार रुपये प्रती टॅंकर असा दर पकडल्यास ३५,३९,५७२ टॅंकरपोटी = १०६१.८७ कोटी रुपये म्हणजेच एक टीएमसी पाण्यासाठी अंदाजे सुमारे एक हजार कोटी रुपये लागतात. 
* बाष्पीभवनाचे अडीच ते तीन टी.एम.सी. पाण्याची किंमत होते सुमारे अडीच ते तीन हजार कोटी रुपये होते. 
थोडक्‍यात, देवाने पावसाच्या रूपाने आपल्याला ही एक मोठी देणगीच दिली आहे असे वाटते. 

------------------------------------------------------------------------------------------------ 
कालव्याची २० ते ३० किलोमीटर लांबीची जमीन ही सरकारला रस्ते, आवश्‍यक बांधकामे, पुनर्वसन, शाळा, मैदाने अशा लोकोपयोगी उपक्रमांसाठी वापरता येऊ शकेल. तेव्हा सकृतदर्शनी देखील हा पर्याय योग्य वाटतो. किंबहुना अलीकडील काही काळात या प्रस्तावाचा बराच अभ्यास झाला आहे, असे कळते. एकूण प्राप्त परिस्थितीत हाच पर्याय व्यवहार्य वाटतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com