पुण्यातील नद्यांची पातळी वाढली; पूल पाण्याखाली पण परिस्थिती नियंत्रणात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

- विविध पूल पाण्याखाली 
- परिस्थिती नियंत्रणाखाली
- या भागाला बसला पाण्याचा फटका 

पुणे ः पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी खडवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे जवळपास भरली आहेत. तरीही धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरणांतील पाणी मुळा- मुठा नदीत सोडण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे मुळा- मुठा नदीची पातळी वाढत आहे. तसेच नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरत आहे. मात्र, पाणी सोडण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना असल्यामुळे आणि दुपारी तीन वाजपर्यंत शहरात पावसाची उघडीप मिळाल्यामुळे संबंधित काठांवरील रहिवाशांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शहर आणि परिसरातील परिस्थिती संपूर्णतः नियंत्रणाखाली असल्याचे महापालिका, पोलिस आणि जलसंपदा विभागाने सांगितले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, पवना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे बाणेरमधील अनेक सोसायट्यांत पाणी शिरले असून ज्युपिटरसह काही रुग्णालयांच्या पार्किंगपर्यंत पाणी पोचले आहेत. 

विविध पूल पाण्याखाली 
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणे जवळपास भरली आहेत. तसेच त्या परिसरातील अन्य धरणेही भरलेली आहेत. पुढील 48 तास पाऊस कायम राहण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चारही धरणांतूून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे मुळा, मुठा आणि पवना नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी औंधमधील राजीव गांधी पूल, महापालिकेमागील जयंतराव टिळक पूल, बाबा भिडे पूल, खडकीतील होळकर पूल आदी पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच शहर व जिल्ह्यातील आपत्ती निवारण विभागाची दुपारी दीड वाजता बैठक झाली आहे. त्यात परिस्थितीचा आढावा घेऊन अग्निशमन दलाला व तसेच महापालिकेच्या यंत्रणांना सुसज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

परिस्थिती नियंत्रणाखाली 
रविवार असल्यामुळे शहरातील वाहतुकीचे प्रमाण कमी असून नागरिकांनी घरी बसणेच पसंत केले आहे. कॅब, रिक्षाही कमी संख्येने रस्त्यावर असून पीएमपी, एसटीची वाहतूक सुरळीत आहे. विमान सेवेवरही फारसा परिणाम झालेले नाही. रेल्वेच्या मुंबई मार्गावरील काही गाड्या रद्द झाल्या आहेत. 

या भागाला बसला पाण्याचा फटका 
गरवारे महाविद्यालयामागील खिलारे वस्ती, पुलाची वाडी, रजपूत झोपडपट्टी, राजीव गांधी कामगार पुतळा वसाहत, विठ्ठलनगर परिसर, संगमवाडी, पाटील इस्टेट, ताडीवाला रस्ता, बाणेर- प्रथमेश सोसायटी, बालेवाडीतील ज्युपिटर हॉस्पिटल आदी, शांतीनगर, एकता नगरी, सरिता नगरी आदी. सुदैवाने कोठेही जिवितहानी झालेली नाही. नागरिकांना काही माहिती हवी असल्यास त्यांनी महापालिकेच्या या हेल्पलाईनवर 18001030222 संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water level of rivers in Pune increased but situation is under control