जलवाहिन्यांची दुरुस्ती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पिंपरी - शहरातील तीन ठिकाणी एमआयडीसीच्या जलवाहिन्या फुटून गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. त्या जोडण्याचे काम शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी पूर्ण झाले. त्यानंतर एमआयडीतील व त्यावर आधारित निवासी भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. 

पिंपरी - शहरातील तीन ठिकाणी एमआयडीसीच्या जलवाहिन्या फुटून गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. त्या जोडण्याचे काम शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी पूर्ण झाले. त्यानंतर एमआयडीतील व त्यावर आधारित निवासी भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. 

सुमारे 45 वर्षे जुन्या म्हणजे 1973 मध्ये या जलवाहिन्या टाकलेल्या आहेत. त्या गंजल्या असून तकलादू झाल्या आहेत. रहदारीमुळे आणि पाण्याचा दाबामुळे त्या फुटून पाणी वाया जात आहे. मात्र, सदर रस्ते एनआयडीसीने महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाई करण्याची परवानगी सप्टेंबर 2017 मध्ये एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांनी पालिकेकडे मागितली आहे. त्याबाबत पत्रव्यवहारही केला आहे. आयुक्तांनी रस्ते खोदाईस परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीकडे पाठविला होता. मात्र, स्थायी समिती सभेसह सर्वसाधारण सभेनेही तो प्रस्ताव तप्तरी दाखल केला आहे. त्यामुळे तुर्त रस्ते खोदाईस एमआयडीसीला परवानगी मिळणे अशक्‍य आहे. परिणामी, जुन्या जलवाहिन्यांतून औद्योगिक परिसराला पाणीपुरवठा करावा लागणार आहे. 

दरम्यान, नेहरूनगर येथील संतोषी माता चौकात बुधवारी रात्री, एमआयडीसी जे ब्लॉकमध्ये कॅंटीन कॉर्नर चौकालगत गुरुवारी सकाळी आणि नाशिक फाटा चौकात गुरुवारी सायंकाळी जलवाहिन्या फुटल्या होत्या. त्यामुळे पाण्याची नासाडी झाली. एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी तिन्ही ठिकाणी त्या वाहिन्यांचे व्हॉल्व्ह बंद करून पाणीपुरवठा खंडित केला होता. शुक्रवारी सायंकाळी तिन्ही जलवाहिन्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दरम्यान, गुरुवारी बहुतांश कंपन्या बंद असतात. काही कंपन्या सुरू राहात असल्याने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र, तुलनेने पाण्याचा वापर कमी होतो. त्यामुळे दाब वाढून जुन्या जलवाहिन्या फुटतात, असे जलवाहिन्या दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

एमआयडीसीला 43 किलोमीटर लांबीच्या 45 वर्षे जुन्या जलवाहिन्या बदलायच्या आहेत. त्यासाठी रस्ते खोदावे लागणार आहेत. मात्र, संबंधित रस्ते महापालिकेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे खोदाईसाठी त्यांची परवानगी आवश्‍यक आहे. त्यामुळे नवीन जलवाहिन्या टाकणे सोयीचे होईल. 
- कल्पेश लहिवाल, उपअभियंता, एमआयडीसी 

Web Title: Water line repairs in Pimpri