यंदा पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

मंजूर कोटा ४८० एमएलडी
जलसंपदा विभागाकडून शहरासाठी दररोज ४८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा कोटा मंजूर आहे. शिवाय, एमआयडीसीकडून महापालिका ३० एमएलडी पाणी दररोज घेते. असे ५१० एमएलडी पाणी शहरासाठी मिळते. मात्र, जुन्या जलवाहिन्या, व्हॉल्व्हमधून होणारी गळती व चोरीचे प्रमाण ३५ टक्‍क्‍यांवर असल्याने काही भागांत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होतो. शहरवासीयांना पुरेसे पाणी देण्यासाठी व उन्हाळ्यातील पाणी प्रश्‍नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पाणीगळती व चोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

परतीच्या पावसाने पवना पुन्हा भरले शंभर टक्के
पिंपरी - परतीच्या पावसामुळे गुरुवारी (ता. ३१) पवना धरण पुन्हा शंभर टक्के भरले आहे. हा पाणीसाठा १५ जूनपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शहरवासीयांची तहान भागणार असल्याची स्थिती आहे.

पवना धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी धरणातून दररोज नदीत विसर्ग सोडला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध पाणी उचलून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाठविले जाते. शुद्ध केलेल्या पाण्याचे शहरातील टाक्‍यांद्वारे वितरण केले जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्येच पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. सध्या गळती व चोरीमुळे काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू आहे. महापालिका प्रशासन व जलसंपदा विभागाच्या धोरणानुसार ३१ ऑक्‍टोबर रोजी धरण शंभर टक्के भरलेले असल्यास १५ जूनपर्यंत पाणीसाठा पुरतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे. सध्या परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. 

कार्यवाही सुरू
पाणी गळती व चोरी रोखण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन टाकण्याचे काम सुरू आहे. पाणी मीटर बदलून दिले जात आहेत. अनधिकृत नळजोड अधिकृत करून दिले जात आहेत. तरीही चोरीचे प्रकार घडल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शिवाय, शहराच्या ४० टक्के भागात केंद्र सरकारच्या २४ बाय सात पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. त्याअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी पावसाळ्यामुळे खोदकाम करता येत नसल्याने चार महिन्यांपासून काम बंद होते. आता ते पुन्हा सुरू केले जाणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून दररोज ४८० दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा केला जात आहे. ३१ ऑक्‍टोबर रोजी पवना धरण शंभर टक्के भरलेले असल्यास पंधरा जूनपर्यंत पाणीसाठा पुरतो. त्यामुळे पुरेसे पाणी मिळेल. मात्र, त्यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे.
- मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Pimpri Chinchwad Pawana Dam Full