#WaterPollution जोराच्या पावसाअभावी नाले गढूळच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - पावसाला सुरवात झाली, की नद्या आणि नाले दुथडी भरून वाहतात. शहरातून वाहणारी मुठा आणि तिला मिळणाऱ्या नाल्यांतील पाणी पावसाळ्यात बहुतांश वेळा स्वच्छ असल्याचे आपल्याला दिसते. तथापि, यंदा मात्र पावसाचा जोर कमी राहिल्याने नाले भर पावसाळ्यातही गढूळच राहिले. याचा परिणाम शहरातील पर्यावरणावर झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केलेल्या पाण्याच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

पुणे - पावसाला सुरवात झाली, की नद्या आणि नाले दुथडी भरून वाहतात. शहरातून वाहणारी मुठा आणि तिला मिळणाऱ्या नाल्यांतील पाणी पावसाळ्यात बहुतांश वेळा स्वच्छ असल्याचे आपल्याला दिसते. तथापि, यंदा मात्र पावसाचा जोर कमी राहिल्याने नाले भर पावसाळ्यातही गढूळच राहिले. याचा परिणाम शहरातील पर्यावरणावर झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केलेल्या पाण्याच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

नाले तपासणीचा उद्देश
शहरातून वाहणाऱ्या दहा वेगवेगळ्या नाल्यांच्या पाण्याची पावसाळ्यातील गुणवत्ता ‘एमपीसीबी’ने तपासली. या नाल्यांमधील सांडपाण्यात मैलापाणी मिसळण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नाले प्रदूषित होतात. हे नाले पुढे जाऊन नदीला मिळतात. त्यामुळे नदीचे पाणीदेखील प्रदूषित होते.

पावसाळ्यात नाल्यांची सुरवात होत असलेल्या ठिकाणी पाण्याची स्थिती नेमकी कशी आहे, हे पाहण्यासाठी १० ते १३ जुलै दरम्यान पाण्याचे नमूने घेण्यात आले. हिवाळा आणि उन्हाळ्यात या नाल्यांतून सांडपाणी वाहत असते. त्यामुळे पावसाळ्यात या नाल्यांची स्थिती तपासण्यात आली.  

हे नाले तपासले
वडगाव खुर्द, वारजे, एरंडवणे, अंबिल ओढा, हिंगणे, नागझरी, बोटानिकल गार्डन येथील नाला, तानाजीवाडी आणि केशवनगर नाला. 

‘बीओडी’ वाढला
शहरातील नाले पावसाच्या पाण्याने भरून वाहत असल्याने ते पावसाळ्यात स्वच्छ होतात. पण, यंदा तानाजीवाडी आणि वडगाव खुर्द येथील नाल्यामध्ये सर्वाधिक ‘बायोकेमिकल ऑक्‍सिजन डिमांड’ (बीओडी) वाढलेली आढळली. ‘बीओडी’चे प्रमाण जेवढे कमी तेवढे ते पाणी चांगल्या गुणवत्तेचे असते. पण, यंदा पावसाळ्यातही या नाल्यांतील पाण्याची गुणवत्ता चांगली नव्हती, हा निष्कर्ष यातून निघाला आहे. इतर नाले-ओढ्यांमधील ‘बीओडी’चे प्रमाण प्रतिलिटर २७ ते ४५ मिलिग्रॅम असल्याचे ‘एमपीसीबी’ने अहवालात नमूद केले आहे. 

ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी  
पाण्यात विरघळलेल्या ऑक्‍सिजनचे प्रमाण जास्त असले पाहिजे. वडगाव खुर्द येथील नाल्यात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण ०.८ टक्के आहे.

शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये कॉलिफॉर्म जिवाणू आढळले आहेत. एकूण कॉलिफॉर्मचे प्रमाण प्रति मिलिलिटरमध्ये १८०० ‘मोस्ट प्रोबॅबल नंबर’ (एनपीएन) पेक्षा जास्त आढळले असून, फिकल कॉलिफॉर्मचे प्रमाण २२५ ते ३५० आढळले आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यास अत्यंत घातक आहे.
- हेरंबप्रसाद गंधे, प्रादेशिक अधिकारी, पुणे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

भैरोबा, नागझरी आणि अंबिल या तीन ओढ्यांमध्ये २०१३ ते २०१६ या दरम्यान पाण्यात विरघळलेल्या ऑक्‍सिजनचे प्रमाण शून्य किंवा शून्याच्या जवळपास आढळले. २०१७ मध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. नाल्यातील पाण्यामध्ये सांडपाण्याचे प्रमाण अधिक असल्याने विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण कमी आहे.
- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे महापालिका.

Web Title: Water Pollution Rain Dranage