मैलामिश्रित घाण पाणी मिसळतेय थेट नदीच्या पाण्यात

रमेश मोरे
रविवार, 3 जून 2018

येथील चेंबर दुरूस्तीचे काम गेल्या आठवड्यातच करण्यात आले होते.तसेच यापुर्वी वारंवार येथील दुरूस्ती करण्यात आली होती कुणीतरी खोडसाळपणे चेंबर फोडत आहे.मी अज्ञाताविरूद्ध सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
- प्रिती गाडे कनिष्ठ अभियंता स्थापत्य 

जुनी सांगवी : जुनी सांगवी, नवी सांगवी पिंपळे गुरव परिसरातील मैलावाहिन्यांचे चेंबर जुने व कमकुवत असल्याचे वारंवार समोर आले आहे. यामुधन गळती होवुन मैलामिश्रित घाण पाणी नदीपात्रात मिसळण्याचे प्रकार यापुर्वी अनेकदा घडले आहेत.

जुनी सांगवी मुळा नदी पात्रावरील मैलाशुद्धिकरण पंपिंग स्टेशन शेजारी दोन चेंबर फोडण्यात येवुन यातील मैलामिश्रित पाणी थेट नदीपात्रात जात असल्याचे नागरीकांच्या लक्षात आले. याबाबत येथील मनसेचे राजु सावळे यांनी नागरिकांच्या वतीने महापालिका संबंधित विभाग व ठेकेदारांवर कारवाईची पर्यावरण विभागाकडे मागणी केली आहे. येथील दोन चेंबर फुटल्याने मैलामिश्रित पाणी थेट नदीच्या पाण्यात मिसळत आहे. आधीच प्रदुषित असलेल्या नद्यांमधुन हे मैलामिश्रित पाणी थेट मिसळत असल्याने नदीप्रुदुषणात भर पडत आहे. उरल्या सुरल्या जलचरांनाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. तर नदीकिनारा भागातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पालिका मलनिस्सारण विभागाकडुन दुर्लक्ष होत असल्याचे येथील रहिवाशी सांगतात.गेली पंधरा दिवसांपासुन अहोरात्र हे मैलापाणी थेट नदीपात्रात जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या मैलाशुद्धीकरण केंद्राचा उपयोग काय ? असा सवाल नागरीक विचारत आहेत. सध्या पावसालाही सुरूवात झाल्याने दुर्गंधी बरोबर रहिवाशांना साथीच्या आजारांचा धोका संभवतो.

मुळा नदीपात्रालगत गेल्या काही दिवसापासून स्थापत्य विभागामार्फत रिटेनिंग वॉलचे काम सुरु आहे. जिथे काम सुरु आहे, त्याच्या बाजूलाच या मैलावाहिन्या लाईन आहेत. येथील दोन चेंबर मधुन दररोज लाखो लिटर मैलायुक्त पाणी दापोडी येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात जात असते. मात्र, संपूर्ण क्षमतेने हे पाणी तिथपर्यंत जात नाही. या ड्रेनेज लाईन गेल्या वर्षभरापासून लिकेज असल्याचे येथील नागरीक सांगतात.तर मलनिस्सारण स्थापत्य विभागाकडुन येथील चेंबर वारंवार दुरूस्ती केल्याचे सांगण्यात आले.कुणीतरी खोडसाळपणाने येथील चेंबर फोडत असल्याची तक्रार पालिका कनिष्ठ अभियंत्याकडुन सांगवी पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

येथील चेंबर दुरूस्तीचे काम गेल्या आठवड्यातच करण्यात आले होते.तसेच यापुर्वी वारंवार येथील दुरूस्ती करण्यात आली होती कुणीतरी खोडसाळपणे चेंबर फोडत आहे.मी अज्ञाताविरूद्ध सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
- प्रिती गाडे कनिष्ठ अभियंता स्थापत्य 

संबंधित प्रकाराची पाहणी करून अधिका-यांना कळवले आहे.दोन दिवसात येथील चेंबरची दुरूस्ती करण्यात येईल.
- हर्षल ढोरे, नगरसेवक

Web Title: water pollution in sangvi pune