घोड नदीकाठावरील 35 गावांना सतर्कतेचा इशारा

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) शुक्रवारी 90 टक्के भरले. धरणाच्या सांडव्यावरून पाणी घोड नदीत सोडले आहे. घोड नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होणार असल्याने आंबेगाव व शिरूर तालुक्‍यातील नदीकाठावरील 35 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, अशी माहिती डिंभे धरणाचे शाखा अभियंता तान्हाजीराव चिखले यांनी दिली.

 

मंचर : डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) शुक्रवारी 90 टक्के भरले. धरणाच्या सांडव्यावरून पाणी घोड नदीत सोडले आहे. घोड नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होणार असल्याने आंबेगाव व शिरूर तालुक्‍यातील नदीकाठावरील 35 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, अशी माहिती डिंभे धरणाचे शाखा अभियंता तान्हाजीराव चिखले यांनी दिली.

भीमाशंकर-आहुपे खोऱ्यात दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आतापर्यंत एकूण एक हजार चार मिलिमीटर पाऊस धरणक्षेत्रात पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 634 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. धरणाच्या उजव्या कालव्यात आज 50 क्‍युसेक पाणी सोडले आहे. शनिवारी (ता. 3) सकाळी एकूण 150 क्‍युसेक पाणी उजव्या कालव्यात सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने केल्याचे चिखले यांनी सांगितले.
धरणातून घोड नदीत सोडलेल्या पाण्याची माहिती पाटबंधारे खात्याने घोडेगाव व मंचर पोलिस ठाण्यांना कळविली आहे.

डिंभे, सुपेधर, शिनोली, कानसे, पिंपळगाव घोडा, गंगापूर, शिंदेवाडी, गोणवडी, घोडेगाव, चास, नारोडी, साकोरे, वडगाव काशिंबेग, एकलहरे, कळंब, चांडोली बुद्रुक, चांडोली खुर्द, खडकी, पिंपळगाव, जवळे, भराडी, निरगुडसर, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, काठापूर, देवगाव, लाखणगाव व शिरूर तालुक्‍यातील गावांतील गोठ्यात जनावरे ठेवू नयेत. विद्युत मोटारींचे नुकसान होऊ नये म्हणून नदीकाठापासून दूर ठेवाव्यात. पोलिस पाटील व कोतवाल यांना पूरस्थितीवर लक्ष ठेवण्याचे व जनजागृती करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.
- प्रदीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक, घोडेगाव पोलिस ठाणे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Realese From Dimbe Dam