पाणीकपात अटळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पुणे - गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला धरणात वीस टक्के पाणीसाठा कमी आहे. पाण्याचा मुबलक वापर सुरूच ठेवला तर मे ते जूनमध्ये धरण कोरडे पडेल. पाणी जपून वापरले पाहिजे. त्यासाठी आत्तापासून काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे, असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणीपुरवठ्यात कपात करण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट संकेत गुरुवारी दिले.

पालकमंत्र्यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांची महापौर बंगल्यात बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हे संकेत दिले. बापट म्हणाले, ‘‘पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा करून बेबी कॅनॉल आणि खडकवासला धरणातून सुरू होणारा उजवा कॅनॉल दुरुस्त करून गळती थांबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी काही दिवस दोन्ही कॅनॉल बंद ठेवावे लागतील. दुरुस्तीनंतर ग्रामीण आणि शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल.’’

सध्या धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे. दहा दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला, तर २० टक्के पाण्याची कमतरता भरून निघेल. यासाठी लोकप्रतिनिधी  एकत्र बसून योग्य ते नियोजन करतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कालवा सल्लागार समितीच्या ऑक्टोबरमधील बैठकीत शहराला ११५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय झाला आहे.

खडकवासला धरण प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणीकपात करावी लागेल. दहा दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला, तर  २० टक्के पाण्याची कमतरता भरून निघेल.
- गिरीश बापट, पालकमंत्री

दुरुस्तीसाठी टेमघर रिकामे
टेमघर धरणाचे पाणी कोणालाही दिले गेले नाही. त्याचा वापर नागरिकांसाठीच करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी धरण रिकामे करण्यात आल्याचेही बापट यांनी सांगितले. 

Web Title: water Reducation in pune