पिंपरी-चिंचवड शहराची पाणी कपात कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याने नागरिकांच्या पाण्याबाबतच्या तक्रारी कमी झाल्या असून, सत्तर टक्‍के नागरिकांची अशीच मागणी आहे. त्यामुळे पवना धरण शंभर टक्‍के भरल्यानंतरच पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

पिंपरी (पुणे) : एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याने नागरिकांच्या पाण्याबाबतच्या तक्रारी कमी झाल्या असून, सत्तर टक्‍के नागरिकांची अशीच मागणी आहे. त्यामुळे पवना धरण शंभर टक्‍के भरल्यानंतरच पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली. 

गेल्या दहा दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे गुरुवारी (ता. 1) सायंकाळी पवना धरण 85 टक्‍के भरले. त्यामुळे पाणी कपात रद्द होईल, अशी शहरवासीयांची अपेक्षा होती. पावसाळ्यात नदीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ते पाणी वापरून रोज पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी होती.
 
महापौर जाधव आणि आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. सध्या धरणात 85 टक्‍के पाणीसाठा आहे. तो शंभर टक्‍के झाल्याशिवाय कपात रद्द न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

याबाबत महापौर जाधव म्हणाले, "पावसाचा भरवसा नसल्याने धरण शंभर टक्‍के भरल्यानंतरच पाणी कपात मागे घेतली जाणार आहे. 15 ऑगस्टला धरणातील पाण्याची पूजा करून याबाबत योग्य ती घोषणा केली जाईल. याउलट एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर पाण्याबाबतच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. शहरातील 70 टक्‍के नागरिकांची एक दिवसाआड पाण्याची मागणी आहे.'' 

धरणात 85 टक्‍के पाणीसाठा आहे. असे असतानाही केवळ टॅंकर लॉबीच्या भल्यासाठीच महापालिका नियमित पाणीपुरवठा करत नाही. सोसायट्यांना पुरेसा पाणीपुरवठा न करणे हे महापालिकेला नक्‍कीच भूषणावह नाही. 
- के. सी. गर्ग, सदस्य, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन 
---------- 

पवना धरणाची गुरुवारी सायंकाळची स्थिती :
गेल्या 12 तासांत झालेला पाऊस : 21 मिलिमीटर
एक जूनपासून झालेला पाऊस : 1960 मिलिमीटर
गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंतचा पाऊस : 2128 मिलिमीटर
धरणातील आजचा पाणीसाठा : 86.34 टक्के
गेल्यावर्षी आजच्या तारखेचा पाणीसाठा : 97.17 टक्के
गेल्या 12 तासांत पाणीसाठ्यातील वाढ : 1.47 टक्के
एक जूनपासून पाणीसाठ्यातील वाढ : 71.88 टक्के


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water reduction in pimpri chinchwad city