तीन धरणांतून विसर्ग वाढविला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

शहरात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
पिंपरी - शहर परिसरात पावसाच्या सरी अधूनमधून पडत आहेत. पवना-मुळा नद्यांच्या पातळीतही काहीशी वाढ झाली आहे. सध्या धरण परिसरात पाऊस पडत असल्याने काही प्रमाणात विसर्ग सुरू आहे. परिणामी, शहरात पाऊस सुरू असल्याने या दोन्ही नद्यांच्या पातळीत पुन्हा थोडी वाढ झाली. पुढील ७२ तासांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्‍यता वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे धरणामधून पाण्याच्या विसर्गही वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. मुंबई-पुणे महामार्गाचीही दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांत पाणी साचत असल्याने चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.

वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने महत्त्वाच्या तीनही धरणांतून पाण्याचा विसर्ग काहीसा वाढविण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्‍यातील भात पिकासाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त ठरत आहे.

मावळ तालुक्‍यात पंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. चोवीस तासांत रविवारी (ता. ८) सकाळी वडगाव येथे १८ मिलिमीटर, तळेगाव दाभाडे (१५), कामशेत (३५), कार्ला (१२७), पवनानगर (२८), वडिवळे (४०), लोणावळा (१३०), तर शिवणे येथे ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. रविवारी सकाळपासूनही पावसाची संततधार सुरू होती. पावसाचा जोर वाढल्याने सर्व धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पवना धरणातून प्रतिसेकंद पाच हजार ७०० क्‍युसेक, वडिवळे धरणातून दोन हजार ५०० क्‍युसेक, तर आंद्रा धरणातून प्रतिसेकंद एक हजार ८०० क्‍युसेक याप्रमाणे पाणी सोडण्यात येत होते. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. 

भातासह अन्य खरीप पिकांसाठी पावसाची आवश्‍यकता होती. गरजेच्या वेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, रविवारी वडगाव, तळेगावसह अनेक गावांमध्ये सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकांवर व कार्यकर्त्यांच्या उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water release in Three Dam Rain