पुण्यातील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

मध्यरात्रीपासून खडकवासल्यातील 23 हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता पुन्हा पाण्याखाली गेला आहे. धरण क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यास आज दुपारी धरणातील विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे.

पुणे : पावसाचा जोर गुरुवारी कमी झाल्याने खडकवासला धरणातील विसर्ग 856 क्यूसेकपर्यंत कमी केला होता, परंतु शुक्रवारी पाऊस वाढल्यामुळे मध्यरात्रीपासून 23 हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता पुन्हा पाण्याखाली गेला आहे. धरण क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यास आज दुपारी धरणातील विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चारही धरणात शुक्रवारी सांयकाळी पाच नंतर पाऊस वाढला, म्हणून पानशेतमधून 5253, वरसगाव 6689 व टेमघर मधून 3943 असा एकूण 14 हजार 855 विसर्ग येत आहे, तर खडकवासला धरणात वरील पाण्याव्यतिरिक्त सुमारे 8 हजार क्यूसेकची आवक आहे. म्हणून 12 वाजता  विसर्ग 22 हजार 880 क्यूसेक करण्यात आला.

गुरुवारी धरण साखळीतील पावसाचा जोर ओसरला होता. म्हणून शुक्रवारी पहाटे एक दरवाजा अर्ध्या फुटाने उघडून 856 क्यूसेक विसर्ग कमी केला होता. आणि अवघ्या आठ तासात धरणाचा विसर्ग म्हणजे शुक्रवारी दुपारी एक वाजता 1712 क्यूसेक, चार वाजता 3424, 6 वाजता 5136 व आठ वाजता 13 हजार 981 केला होता. शुक्रवारी रात्री 10 वाजल्यानंतर पानशेत वरसगाव व टेमघर धरणातील विसर्ग वाढल्याने 22 हजार 880 क्यूसेक विसर्ग वाढविला. 

पानशेत ,वरसगाव, टेमघर व खडकवासला ही चारही धरणे शंभर टक्के भरून वाहत आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी सकाळी सहा वाजता मागील 24 तासात टेमघर येथे 123, वरसगाव येथे 66, पानशेत येथे 65 व खडकवासला येथे 9 मिलीमीटर पाऊस झाला. पानशेत वरसगाव या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रायगड जिल्ह्यालगतच्या डोंगरी भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसाळी  वातावरण अद्याप कायम आहे.  मुठा सिंहगड भागातील नद्या, ओढे  दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पाण्याची आवक सुरू आहे.

'धरण खोरयातील संततधारेमुळे चारही धरणांतील साखळी क्षेत्रातील चार धरणात पावसाचा जोर वाढल्याने पानशेत वरसगाव व टेमघर धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्या दोन्ही धरणातील विसर्ग वाढवावा लागला. परिणामी खडकवासलातील विसर्ग टप्पा टप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. असे खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागिय अभियंता राजकुमार क्षीरसागर यांनी सांगितले. आज पावसाचा जोर कमी झाल्यास विसर्ग कमी केला जाईल असे ही पाटबंधारे विभागकडून सांगण्यात येत आहे.

22 टीएमसी पाणी सोडले
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पावसाने चार धरण 100 टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदीत आता पर्यंत 20 टीएमसी तर कालव्यातून सुमारे सव्वा दोन टीएमसी पाणी सोडल्याचे माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water released increased from Khadakwasla dam to Mutha river in Pune