नीरा-देवघरमधून विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

भोर - तालुक्‍यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून नीरा-देवघर धरणातून दररोज १ हजार ६०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे. 

भोर - तालुक्‍यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून नीरा-देवघर धरणातून दररोज १ हजार ६०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे. 

वीर धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी व पिण्यासाठी विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणीपातळी ठेवण्यासाठी नीरा-देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. भोरहून भोलावडे गावाला जाणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्याने त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाटघर व नीरा-देवघर धरणात सर्वाधिक पाणीसाठा आहे. सध्या नीरा-देवघर धरणात ७५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गतवर्षी या वेळी हा पाणीसाठा ६६२ दशलक्ष घनफूट होता. १२ टीएमसी क्षमता असलेल्या नीरा-देवघर धरणात सध्या ०.७५ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून आणखी दोन दिवस विसर्ग सुरू राहणार आहे. 

चोवीस टीएमसी क्षमता असलेल्या भाटघर धरणात सध्या १.७ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी तो २.७५ टक्के होता. वीरच्या डाव्या कालव्यातून ८२७ क्‍युसेक, तर उजव्या कालव्यातून १ हजार ५५० क्‍युसेक पाणी सोडले जात आहे.

Web Title: water released from Nira Deoghar dam