शिरसाई योजनेतून सोडलेले पाणी वापरले जातेय विटभट्टीसाठी

संतोष आटोळे 
सोमवार, 9 एप्रिल 2018

तलावात सोडण्यात आलेले पाणी विटभट्टी चालक अवैध रित्या भरदिवसा उपसा करीत असुन याकडे ग्रामपंचायतीचेही दुर्लक्ष आहे. तर या भागातील शेतकऱ्यांनी सांगुनही संबंधित व्यावसायिक त्यांना दाद देत नसल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.

शिर्सुफळ - शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामपंचायती यांनी पाणीपट्टी भरुन शिर्सुफळच्या पाणीपुरवठा योजनेलगत असलेल्या दत्तवाडी तलावामध्ये गेल्या आठवड्यात पाणी सोडण्यात आले. मात्र आता प्रत्यक्षात या तलावात सोडण्यात आलेले पाणी विटभट्टी चालक अवैध रित्या भरदिवसा उपसा करीत असुन याकडे ग्रामपंचायतीचेही दुर्लक्ष आहे. तर या भागातील शेतकऱ्यांनी सांगुनही संबंधित व्यावसायिक त्यांना दाद देत नसल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती तालुक्यातील शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्याच्या जिरायत भागातील लाभक्षेत्रातील पाणीपट्टी भरलेल्या गावांमधिल तलाव, बंधारे भरण्यात आले. याचा फायदा संबधित गावांना होत आहे. आवर्तनाच्या अंतिम टप्प्यात शिर्सुफळ गावठाणच्या पाणी उद्भवाच्या जवळ असलेल्या दत्तवाडी तलावामध्ये संबंधित भागातील शेतकरी व शिर्सुफळ ग्रामपंचायतीने पुढाकार घेत पाणीपट्टी भरली व या योजनेच्या माध्यमातुन तलावात पाणी सोडले. या माध्यमातून तलावात चांगला पाणीसाठा झाला. यामुळे गाव पाणीपुरवठा विहिंरीसह परिसरातील विहिरी, कुपनलिका, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

आता मात्र या तलाव परिसरात सुरु असलेल्या विटभट्टी चालकाने तलावमधुन भरदिवसा व्यवसायिक कामांसाठी पाणी उपसा सुरु केला आहे. याबाबत या भागातील शेतकऱ्यांनी त्यांना याबाबत कल्पना देवुनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर ग्रामपंचायतीचेही या प्रकाराकडे लक्ष नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच हा उपसा असाच सुरु राहिल्यास ऐन उन्हाळ्यात शिर्सुफळकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.याप्रश्नावर लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

तलाव क्षेत्रातच विटभट्टी? 
शिर्सुफळ पाणीपुरवठा योजनेच्या वरच्या बाजुला असलेला दत्तवाडी तलाव अतिशय मोठा आहे. मात्र गेल्या काही वर्षापासुन तलाव क्षेत्रामध्ये सर्वच बाजुंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. याबाबत ग्रामपंचायत तसेच महसुल विभागाने लक्ष देवुन शासकिय मालमत्तेचे जतन करणे गरजेचे आहे. याबरोबरच संबंधित विटभट्टी खाजगी क्षेत्रात आहे की तलाव क्षेत्रात याचीही माहिती घेवुन याबाबत तात्काळ कार्यवाहीची मागणी होत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The water released by the water tank is illegal