
Water Scarcity : पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या डोळ्यांत ‘पाणी’
कोथरूड : ‘सतत होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आम्हाला पुन्हा जुने दिवस आले आहेत. पाणीटंचाईच्या काळातील आठवणी ताज्या झाल्या आहेत. ही अघोषित पाणीबाणी कशासाठी सुरू आहे,’ असा संतप्त सवाल भुसारी कॉलनीतील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डावी व उजव्या भुसारी कॉलनीमध्ये पाणीपुरवठा कमी प्रमाणात व खूप कमी दाबाने होत आहे, तसेच पाण्याची वेळदेखील कमी झाली आहे. याबाबत वारंवार प्रशासनाला तक्रार करूनदेखील त्यावर अद्याप ठोस नियोजन होताना दिसत नाही. या उलट दिवसेंदिवस या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या बिकट होत चालल्याची नागरिकांची तक्रार आहे.
माजी नगरसेविका अल्पना वरपे म्हणाल्या की, खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा असताना देखील केवळ अधिकाऱ्यांच्या दिरंगाईपणामुळे लाखो नागरिकांना त्रास सहन कराव लागत आहे. योग्य नियोजन नसल्यानेच ही कृत्रिम पाणी टंचाई उद्भवली आहे, असे माझे ठाम मत आहे.
पुरेसे पाणी मिळणे हा सर्वांचाच हक्क आहे. त्यामुळे पाषाण भागाला पाणी दिले जाते, याच्यावर आक्षेप नाही, परंतु आमच्या हक्काचे पाणी बंद करून दुसरीकडे देणे हा आमच्या भागातील नागरिकांवर अन्यायच नाही का, असेही त्यांनी नमूद केले.
या भागाला पुरवठा करत असलेल्या चांदणी चौक टाकीची रोज येणाऱ्या पाण्याची पातळी पूर्वीपेक्षा १ ते १.५ मीटरने कमी झाली आहे, त्याचा परिणाम दाबावर व पाणीपुरवठ्यावर होत आहे. याच टाकीतून पाषाण भागाला जाणाऱ्या पाण्याची वेळ व पंपिगची वेळ वाढविल्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र अधिकारी पाणी प्रश्न असल्याचे मान्य करत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
मधू-मालती अपार्टमेंटमधील रहिवासी प्रदिप थरथरे यांनी सांगितले की, भुसारी कॉलनीतील गल्ली क्रमांक ३, ४, व ५ मधील सोसायट्यांना गेले महिनाभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. रीतसर तक्रार करुनही त्याचे निवारण झालेले नाही.
समस्याग्रस्त भाग
भुसारी कॉलनी गल्ली क्रमांक ३ व ४,
पंडित भीमसेन जोशी उद्यान परिसर
प्रथमेश अपार्टमेंट, सिद्धार्थ कुंज
प्रथमेश वंदन, रुणवाल पॅराडाईज
शांतिबन, इंद्रायणी सोसायटी
हर्बिजेर सोसायटी
टाकीवर चढून आंदोलन
कोथरूडमधील भुसारी कॉलनीचा पाणीप्रश्न सुटावा म्हणून एकेकाळी येथील नागरिकांना न्यायालयापर्यंत लढा न्यावा लागला होता. त्यानंतर चांदणी चौकात पाण्याची टाकी झाली व भुसारीतील पाणीटंचाई संपली. मध्यंतरी पाषाण, बाणेरच्या लोकांनी चांदणी चौकातील टाकीवर चढून आंदोलन केल्यानंतर या टाकीतून पाषाण भागाला पाणी सोडण्यात येऊ लागले. तेव्हापासून भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई जाणवू लागली.
कोथरूड परिसरातील वाढलेली लोकसंख्या पाहता पाणीपुरवठादेखील त्या प्रमाणात वाढवायला हवा, परंतु कोथरूडला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात त्याप्रमाणात वाढ झालेली दिसत नाही. उलट कोथरूडच्या वाट्याचे पाणी पाषाणला पाठवत आहेत. त्यामुळे आम्हाला कमी पाणी मिळत आहे.
- अविनाश दंडवते, संस्थापक अध्यक्ष, अखिल भुसारी कॉलनी मित्र मंडळ
पंपिंगच्या वेळापत्रकात आजपासून बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीला टाकीत विशिष्ट उंची तयार झाली. त्यामुळे आज सकाळी अधिकाऱ्यांसोबत आम्ही पाहणी केली असता तक्रार असलेल्या भागात सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. आता तक्रार राहणार नाही.
- प्रीतम कसबे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय