'वाघोली, पिरंगुट परिसरातील पाणी योजनांचे काम तातडीने'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे  - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील वेगाने नागरीकरण झालेल्या वाघोली आणि पिरंगुट परिसरात प्रत्येकी अर्धा टीएमसी क्षमतेच्या पाणीपुरवठा योजनांचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे; मात्र हे करत असताना पुणे किंवा पिंपरी-चिंचवड शहराच्या पाण्यात एक थेंबही कपात केली जाणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी स्पष्ट केले. 

पुणे  - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील वेगाने नागरीकरण झालेल्या वाघोली आणि पिरंगुट परिसरात प्रत्येकी अर्धा टीएमसी क्षमतेच्या पाणीपुरवठा योजनांचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे; मात्र हे करत असताना पुणे किंवा पिंपरी-चिंचवड शहराच्या पाण्यात एक थेंबही कपात केली जाणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी स्पष्ट केले. 

पीएमआरडीएच्या स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे आदी उपस्थित होते. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्राचा पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाच्या सहकार्याने स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. आराखडा करताना पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील सर्व धरणे आणि जलस्रोत विचारात घेतले जाणार आहेत. प्रायोगिक स्वरूपात वाघोली आणि पिरंगुट या ठिकाणी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिसरात उपलब्ध असलेल्या नदी आणि धरणांतील पाण्याचा वापर त्यासाठी केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले 

विविध माध्यमातून पाण्याच्या बचतीवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन पाण्याचे तात्पुरते साठे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी लागणारी आवश्‍यक यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन बापट यांनी या वेळी दिले. जलस्रोतांमधला गाळ काढणे, नाला साफ करणे, लहान बंधारे बांधणे अशा माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

कृष्णा खोरे पाणीवाटप सूत्रांनुसार, उपलब्ध सर्व पाण्याचे वाटप यापूर्वीच निश्‍चित झाले आहे. त्यामुळे पुण्याच्या परिसरात नव्याने धरण बांधण्याचा विचार नाही. धरणाच्या माध्यमातून पाणीसाठा वाढला, तर त्याच्या वाटपासाठी पुन्हा लवादाकडे जावे लागेल. त्यातून आंतरराज्य समस्या निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने वाढीव पाण्याऐवजी पाणीबचतीचा मार्ग सयुक्तिक असल्याचा दावा त्यांनी केला. 

प्राधिकरणाच्या क्षेत्रातील एकूण धरणे -16 
सर्व धरणांची मिळून साठवण क्षमता- 109.24 टीएमसी 
त्यापैकी सिंचनासाठी आरक्षित पाणी - 64.75 टीएमसी 
घरगुती वापरासाठी पाणी - 30.32 टीएमसी 
-औद्योगिक वापरासाठी पाणी 4.63 टीएमसी 
-पीएमआरडीए क्षेत्रातील लोकसंख्या- 73 लाख 
-प्राधिकरण क्षेत्रासाठी पाण्याची आवश्‍यकता - 15.18 टीएमसी 

Web Title: water schemes in Wagholi Pirangut area is promptly done PMRDA