आळंदीत इंद्रायणीला पूर; नळ मात्र कोरडे

Pani
Pani

आळंदी (पुणे) : इंद्रायणी नदीला पूर आहे; पण घरच्या नळाला पाणी नाही. आम्ही पाणीपट्टी भरतो मग आम्हाला पाणी का नाही, असा सवाल आळंदी पालिका प्रशासनाला प्रभाग चारमधील संतप्त महिलांनी विचारला. गेल्या अडीच वर्षांपासून शहरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर असतानाही पालिका प्रशासनाने गुळगुळीत उत्तरे दिल्याने महिलांचा पारा अधिकच चढल्याचे आळंदीकरांनी पाहिले.

बंद नळाला अपुऱ्या दाबाने, तर कधी दिवसाआड पाणी येत असल्याची समस्या घेऊन प्रभाग चारच्या महिला पालिकेत आल्या. साडे पाच कोटी रुपयांचा जलशुद्धीकरण प्रकल्प, पाच ठिकाणी मोठे जलकुंभ बांधले, इंद्रायणीला पूर आहे. मग नळाला येणारे पाणी कधी गढूळ तर कधी पांढरे फटक का? असा सवाल विनया सुर्वे, सुधा लोणकर, छाया हरिहर, संगीता सकपाळ यांनी केला. यावर मुख्याधिकारी समीर भूमकर आणि पाणीपुरवठा विभागप्रमुख दत्तात्रेय सोनटक्के यांनी गुळगुळीत उत्तर देत व्हॉल्व्हची दुरुस्ती करायची आहे. आठवड्याभरात पाणीपुरवठा सुरळीत करू, असे सांगितले.

याबाबत प्रभाग चारचे नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांनी सांगितले, ""ठराविक ठिकाणचे व्हॉल्व कर्मचारी कुणाच्या तरी सांगण्यावरून कमी जास्त प्रमाणात ढिले करून ठेवतात. यामुळे पाण्याचे असमान वाटप होत आहे. पालिकेने जनरेटर खरेदी केल्याने चोवीस तास जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू असल्याचे प्रशासन सांगते. दिवसाला एक कोटी लिटर पाणी शुद्धीकरणाची क्षमता आहे. तर शहरातील बारा हजार नळांना पाणी का येत नाही. मुख्याधिकारी शहरात कधी फिरत नसल्याने कर्मचारीही रोडावले आहे. प्रभाग तीन आणि चारमध्ये पाणीटंचाई आहे.''

पाणीपुरवठा आणि विद्युत विभाग दोन्हींचा कारभार दत्तात्रेय सोनटक्के एकटेच पाहतात. अनेक वेळा दोन विभागासाठी दोन स्वतंत्र व्यक्ती नेमण्याची शिफारस माझ्यासह अनेक नगरसेवकांनी केली. अकार्यक्षम लोकांची संबंधित विभागातून वारंवार बदली केली तरच पालिका नागरिकांना सुविधा देईल.
वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्ष

दिवसाआड पुरवठा केला तर सर्वांना पाणीपुरवठा होईल. प्रत्येक प्रभागात पाणी मिळेल. जुन्या आणि नव्या पाइपलाइनचा घोळ आहे. पूर्वी दोन टाक्‍या होत्या. आता पाच टाक्‍या आहे. पाइपलाइनचे अंतर वाढल्याने टाकी भरण्यास वेळ लागतो. याशिवाय अनेक जण नळाला थेट मोटार लावतात. यावर आता मोटार जप्तीची कारवाई करण्याची आवश्‍यकता असून, तशी सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या जातील.
समीर भूमकर, मुख्याधिकारी, आळंदी पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com