kAlAVA
kAlAVA

शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळच

उंडवडी (पुणे) : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने पूर्ण होत आले, तरीदेखील बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात अद्यापही दमदार पाऊस नाही. त्यामुळे या भागातील लोकांना ऐन पावसाळ्यात तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शिरसाई उपसा योजनेचे पाणी देखील लाभार्थी गावात मृगजळ ठरू लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात गेली तीन-चार वर्षे कमी प्रमाणात होत असलेल्या पर्जन्यमानामुळे यावर्षी मोठ्या दुष्काळाला या भागातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. यंदा जून, जुलै आणि ऑगस्टचा पंधरवडा झाला तरी देखील दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात टॅंकर सुरूच आहेत.

कारखेल, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, साबळेवाडी, खराडेवाडी, अंजनगाव, जळगाव सुपे, साबळेवाडी, शिर्सुफळ, उंडवडी कडेपठार, गोजुबावी, बऱ्हाणपूर, जराडवाडी ही गावे शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात येतात. पाऊस नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे भविष्य शिरसाईच्या पाण्यावर अवलंबून असताना संबंधित अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ही योजना संपूर्ण आवर्तन पूर्ण न करताच पाच दिवसातच बंद पडली. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रिमझिम पावसावर आलेली खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी अंतिम घटका मोजत आहेत. त्यामुळे शिरसाई उपसा योजनेचे पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी लाभार्थी गावांतून होत आहे.

कार्यक्षेत्रात कार्यालय हवे
शिरसाई उपसा सिंचन योजनेत लाभार्थी गावे बारामती तालुक्‍यातील आहेत. मात्र, या योजनेचे कार्यालय दौंड तालुक्‍यातील पाटस येथे आहे. यामुळे शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये समन्वयक नसल्याने पाणीपट्टी अथवा पाण्याची मागणी करणे शेतकऱ्यांना जिकिरीचे होत आहे. अनेकदा शेतकऱ्यांना पाणीपट्टी व पाणी मागणीचा अर्ज घेऊन गेल्यानंतर अधिकारी कार्यक्षेत्रात असल्याचे सांगितले जाते. यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्याची वेळ येते. त्यामुळे या योजनेचे कार्यालय शिरसाईच्या लाभार्थी गावात व्हावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com