शहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

सिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या १६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमध्ये अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता, की ते थेट सिंहगड रस्त्यावर आले. 

या घटनेमुळे पु. ल. देशपांडे उद्यानासमोरील बसथांबा परिसरात साडेतीन ते चार फूट पाणी साचले होते. तब्बल दोन तास पाण्याचा अखंड प्रवाह सुरू होता. एकीकडे धरणातील पाण्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभागात खडाजंगी सुरू असताना पुणेकरांसमोर या घटनेमुळे पाण्याचे नवे संकट उभे राहिले. 

चुना भट्टी परिसरात महापालिकेचे ‘रॉ वॉटर पंपिंग स्टेशन’ आहे. यात एका मोठ्या पाइपद्वारे पाणी येते. येथून प्रक्रिया झाल्यानंतर पाणी शुद्धीकरण केंद्रात सोडले जाते. मात्र, खडकवासला येथून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात आलेल्या  वाहिनीवरील इलेक्‍ट्रिक ऑटोमॅटिक व्हॉल्व्हमध्ये अचानक बिघाड झाल्याने तो बंद झाला नाही. परिणामी, टाकी ओव्हरफ्‍लो होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले.

टाकीच्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. तेथे काही प्रमाणात नुकसान झाले. हे पाणी सिंहगड रस्त्यापर्यंत वाहत गेले. या रस्त्यावरील पावसाळी वाहिन्यांवर प्लॅस्टिक आणि कपडे पडले असल्याने तेथून पाणी जाऊ शकले नाही. अग्निशामक दलाचे जवान, पोलिस आदी सर्व यंत्रणा आल्यानंतर पावसाळी वाहिन्यांवरील अडथळे दूर केले गेले. त्यानंतर रस्त्यावरील पाण्याची पातळी कमी झाली. दरम्यान, मॅन्युअली व्हॉल्व्ह बंद केल्यानंतर पाणी बंद झाले. मात्र तो बंद करण्यासाठी दीड तासाचा कालावधी लागला. पाण्यामुळे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी 
झाली होती.

Web Title: Water Shortage in City