पाणी देता का पाणी?..धायरीकरांचा टाहो!

धायरी - पाणीप्रश्‍नी आयोजित बैठकीत बोलताना सामाजिक कार्यकर्ते काका चव्हाण.
धायरी - पाणीप्रश्‍नी आयोजित बैठकीत बोलताना सामाजिक कार्यकर्ते काका चव्हाण.

पुणे/ सिंहगड रस्ता - कोणाला सकाळीच ऑफिसला जायचं असतं, कोणाला उद्योग-धंद्यासाठी घराबाहेर पडायचं असतं. काहींच्या घरात आजारी आजी-आजोबा, काही कुटुंबांत लगीनघाई, तर कोणाच्या घरात मुंजीचा कार्यक्रम आहे... पण या घरांमधील प्रत्येक व्यक्ती सध्या धावपळ करतेय, ती पिण्यापुरते पाणी मिळविण्यासाठी. काही लग्न मांडवांत तर पाण्यासाठीची घाई दिसून आली. एक-दोन नव्हे, तर गेले चार-पाच दिवस धायरीतील लाखो रहिवाशांना पाणी मिळेनासे झाले आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यात या भागातील लोक त्रस्त झाले आहेत. 

महापालिकेकडे अपुरी यंत्रणा
या भागातील भीषण पाणीटंचाईचे कारण आहे महापालिकेची पाणीपुरवठा करणारी तोकडी यंत्रणा. दुसरे कारण आहे पाणीचोरांविरोधात जबाबदार यंत्रणांनी पावले उचलताच पाणीपुरवठादार (टॅंकर पॉइंट मालक) आणि टॅंकरचालकांची आडमुठी भूमिका. त्यामुळे धायरीत ‘पाणीबाणी’ निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

धायरीसह संपूर्ण शहरात पाणीटंचाई असताना कालव्यातून होत असलेल्या पाणीचोरीकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले. त्यानंतर भेदरलेल्या पॉइंट मालकांनी पाणी न पुरविण्याची भूमिका घेतली. त्यामुळे टॅंकरचालकांकडे मागणी करूनही लोकांना पाणी मिळत नाही. परिणामी, या भागातील दीडशे ते दोनशे सोसायट्यांमधील रहिवाशांचे अतोनात हाल सुरू आहेत. त्यातच, पुरेसे टॅंकर नसल्याने महापालिकाही धायरीतील लोकांना पुरेसे पाणी देऊ शकत नाही.

या कात्रीत सापडलेल्या धायरीतील लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर काही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. तेव्हा, रहिवाशांनी आपली गाऱ्हाणी मांडली. ‘‘आमच्याकडून पैसे घ्या; पण आम्हाला किमान पाणी द्या,’’ अशी अपेक्षा त्यांनी बैठकीत व्यक्त केली.

...म्हणून पॉइंट मालकांना प्राधान्य
महापालिकेच्या जलकेंद्रातून ५२२ रुपयांत खासगी टॅंकरचालकांना पाणी पुरविले जाते. मात्र, कालव्यातून पाण्याची चोरी करणाऱ्या पॉइंट मालकांकडून हाच टॅंकर केवळ दीडशे रुपयांत भरून मिळतो. त्यामुळे या भागातील टॅंकरचालक-मालक ‘पॉइंट मालका’ना प्राधान्य देतात. त्यातच, पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बळ मिळत असल्याने पाणीपुरवठादारांचे फावत आहे. त्यातून मोठे अर्थिक गणित जुळवून पाणीपुरवठादार आणि अधिकारी आपापले भले करीत आहेत. त्याचाही परिणाम, धायरीसह अन्य भागातील लोकांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. 

पदाधिकाऱ्यांच्या घोषणाच
धरणात कमी पाणी असले तरी पुणेकरांना अजिबात पाणी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्री, महापौर आणि महापालिकेतील अधिकारी करीत होते. प्रत्यक्षात मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांचे अपुऱ्या पाण्यामुळे हाल होत आहेत. त्यातच धायरीतील हजारो घरांमध्ये सलग चार-पाच दिवस पाणी येत नसतानाही लोकांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्नही पालकमंत्री, महापौर आणि स्थानिक नगरसेवकांनी केलेला नाही. उलटपक्षी राज्य सरकारच्या म्हणजे, पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोसलेल्या पाणीचोरांनी लोकांची अडवणूक केली आहे. 

पाटबंधारेचे अधिकारी  व पाणी पुरवठादारांची साखळी लोकांकडून जादा पैसे घेऊन पाणीपुरवठा करीत असल्याचे उघड झाले. या गावाचा महापालिकेत समावेश होऊन दोन वर्षे होत आली तरी, नगरसेवकांना पाण्याचा प्रश्‍न सोडविता आलेला नाही. नव्या गावांतील पाणी, वाहतूक आणि आरोग्य या समस्यांना प्राधान्य असेल, असे पालकमंत्री, महापौर यांनी वारंवार जाहीर केले. मात्र, धायरीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 

टाकी बांधली, पण...
धायरी गावात रायकर मळा परिसराच्या पुढे पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. मात्र, टाकीतून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन अद्याप झाली नाही. ती लवकरात लवकर करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या भागाला कायमस्वरूपी पुरेसे पाणी मिळावे, यासाठी आधी ना ग्रामपंचायत, ना आता महापालिका प्रशासनाने कोणते प्रयत्न केले. या भागात पाणी आहे, अशी सोयीस्कर समजूत करून घेत धायरीत पाणीपुरवठा योजना राबविली नाही, असे नागरिकांनी सांगितले.

धायरीत अपेक्षित पाणीपुरवठा सुरू असून, मागणीनुसार टॅंकर वाढवू.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com