पाणीकपातीमुळे नागरिकांचे हाल (व्हिडिओ)

Water Shortage
Water Shortage

पुणे - शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीने घेतल्यानंतरही पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नसल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली खरी; मात्र कोणतीही सूचना न देता पाणीकपातीच्या निर्णयाची बेधडकपणे अंमलबजावणी करीत, जलसंपदा खात्याने पालकमंत्र्यांची घोषणाच उडवून दिली. त्यामुळे ऐन सणासुदीतच शहरातील पूर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने लोकांचे गुरुवारी (ता. 11) प्रचंड हाल झाले.

कालवा फुटीमुळे आठवडाभर पाणीटंचाई सोसलेल्या या भागातील लोकांना आज पुन्हा अचानक पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. मात्र, जलसंपदा खात्याशी चर्चा झाली असून, त्यामुळे नियोजित पाणीसाठा उचलला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे शुक्रवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होण्याची आशा आहे. 

महापालिका आणि जलसंपदा खात्यातील वादामुळे पुणेकरांचे हाल होत असताना पालकमंत्र्यांनी दिवसभर "ब्र'ही काढला नाही, त्यामुळे या खात्याचे धाडस वाढले आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्यासह आमदार आणि भाजपचा एकही नगरसेवक पुणेकरांच्या बाजूने उभा राहिला नाही. कालवा समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याचे सांगत, पर्वती जलकेंद्रातील तीनपैकी एक पंप खात्याने बंद केला. विशेष म्हणजे, पोलिस बंदोबस्तात ही कार्यवाही केली. महापालिकेचे पत्र आल्याशिवाय पाणीसाठ्यात कपात करणार नाही, असे खात्याच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे महापालिकेच्या पातळीवर पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरू होती. त्याआधीच जलसंपदा खात्याने पाणीपुरवठा बंद केला. 
शहरासाठी घेण्यात येणाऱ्या 1350 "एमएलडी'ऐवजी रोज 1150 एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कालवा समितीने गेल्या आठवड्यात घेतला. डोळ्यादेखत हा निर्णय होऊनही बापट यांनी त्यास विरोध केला नाही.

पाणीसाठ्यातील कपातीमुळे पाणीकपात होणार असल्याचे स्पष्ट होताच, बापट यांनी पाणी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा केल्यामुळे दिलासा मिळण्याची आशा होती. प्रत्यक्षात मात्र, त्यांच्या घोषणेला जलसंपदा खात्याने जुमानले नाही. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेत आंदोलन केले. 

बापट म्हणाले होते.... 
'कालवा समितीच्या बैठकीत 1150 "एमएलडी' पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, ते वाढवून 1200 "एमएलडी' करण्यात येईल. आणखी पाऊस झाल्यास ही परिस्थिती बदलेल. याशिवाय पाणीचोरी रोखणे, मुंढवा जॅकवेलमधून शेतीसाठी पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजनाही राबविण्यात येणार आहेत. मुळात, वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली असून, त्याप्रमाणात तो केला जाईल. पुणेकरांना दोन वेळा पुरेसे पाणी मिळेल, ते कमी पडू देणार नाही.'' 

महापौर म्हणाल्या होत्या... 
'पाणीकपात करावी लागणार आहे, त्याबाबत पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर नव्या वेळापत्रकानुसार पाणी पुरविले जाईल.'' 

शिवतारेंचा काटकसरीचा सल्ला 
पुणे महापालिका ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाणी घेत असल्याची जुनीच कॅसेट जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी वाजविली. 
पुणेकरांना अधिक पाणी दिले जाते. मात्र, शेतकरी शेतीसाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करतात. शहराबरोबर ग्रामीण भागातील शेतीलाही पाणी मिळणे गरजेचे आहे, त्यामुळे पुणेकरांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असा सल्ला त्यांनी दिला. 

जास्त पाणी घेत असल्याने कार्यवाही
खडकवासला - महापालिका खडकवासला धरणातून जास्त पाणी घेत असल्याने पाटबंधारे विभागाने धरणाजवळील पालिकेच्या पंपिंग स्टेशनमधील एक वीजपंप बुधवारी (ता. 10) पोलिस बंदोबस्तात बंद केला, असे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज स्पष्ट केले. 
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सध्या धरणात शिल्लक असलेल्या पाणीसाठ्यानुसार 1150 एमएलडी पाणी महापालिकेने घेणे अपेक्षित होते. मात्र, पालिका 1600 एमएलडी पाणी घेत आहे. तो पाणीपुरवठा 1650 एमएलडीपर्यंत वाढविला होता. त्यामुळे, आम्ही बुधवारी पंपिंग स्टेशनवर जाऊन पोलिस बंदोबस्तात वीजपंप बंद केला. याबाबत, धरणाजवळ पालिकेने जलवाहिनीवर बसविलेल्या मीटर रीडिंगनुसार आम्ही पाण्याचे मोजमाप ठरवितो. वीजपंप बंद केल्याने गुरुवारी सकाळी 1247 एमएलडी पाणी पालिकेने उचलले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार 1150 एमएलडी पाणी आम्ही पालिकेला देणार आहोत, असे पाटबंधारे विभागच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com