टॅंकर मंजूर होऊनही जुन्नरमधील गावे तहानलेली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

जुन्नर - जुन्नर तालुक्‍यातील ७ गावे व ७७ वाड्या-वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सहा टॅंकर १७ मेला मंजूर केले. मात्र, प्रत्यक्षात टॅंकर उपलब्ध झाले नसल्याने तालुक्‍यातील तहानलेल्या गावांना टॅंकरचे पाणी मिळू शकले नाही.

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना तहानलेली गावे व वाड्यांतील सुमारे १६ हजार ७५४ ग्रामस्थांच्या लोकवस्त्या टॅंकरच्या प्रतीक्षेत आहेत. दुर्गम हिवरे पठारावरील सुकाळवेढे, हिवरेतर्फे मिन्हेर ही गावे त्यांच्या प्रत्येकी तीन वाड्या तसेच हातविज व गुळुंचवाडीच्या तीन वाड्या यांनी टॅंकरने पाण्याची मागणी केली आहे. दुर्गम आदिवासी भागातील कोपरे, मांडवे, मुथाळणे येथे खासगी टॅंकर जात नसल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी शासकीय टॅंकरची मागणी करण्यात आली होती. परंतु शासकीय टॅंकर मंजूर झाला नाही. त्याऐवजी खासगी संस्थेस टॅंकर पुरविण्याबाबत आदेश देण्यात आले असल्याने या गावाचा पाणी प्रश्न सुटणार नसल्याचे दिसत आहे.

आदिवासी भागातील कोपरे, मुथाळणे, जळवंडी, अंजनावळे, आलमे तर पूर्व भागातील नळवणे व शिंदेवाडी अणे गावाच्या वाड्यांसह ७७ वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. येथे पाणीपुरवठा करण्यासाठी बारामतीच्या मे. अजितदादा वाहतूक संस्थेकडून टॅंकर देण्यात येणार आहेत.

Web Title: water shortage in junnar village water tanker