खानवडीत पुरेना टॅंकरचे पाणी

खानवडी (ता. पुरंदर) - पाणी न मिळाल्याने हताशपणे टॅंकरकडे पाहताना ग्रामस्थ.
खानवडी (ता. पुरंदर) - पाणी न मिळाल्याने हताशपणे टॅंकरकडे पाहताना ग्रामस्थ.

खळद - खानवडी (ता. पुरंदर) येथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, या ठिकाणी सध्या प्रशासनाकडून दररोज एक टॅंकर याप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हे पाणी पुरेसे ठरत नसल्याने येथील जनताही तहानलेलीच आहे. टॅंकरच्या खेपा वाढवण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

खानवडीत दीड महिन्यापासून प्रशासनाकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दररोज एक टॅंकर पाणी गावासाठी दिले जाते. हे पाणी काही दिवस गावच्या सार्वजनिक विहिरीत सोडले जाते, तर काही दिवस गावचा मधला मळा, वरचा मळा या वस्त्यांना दिले जाते. हे पाणी मिळविण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ लागलेली असते. पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड उडत आहे. 

ग्रामसेवक विठ्ठल रावते म्हणाले, की दीड महिन्यापूर्वी पाण्याच्या मागणीनुसार सरकारकडे टॅंकरचा प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार सरकारने टॅंकर सुरूही केला. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता परिसरात सर्व विहिरी अथवा विंधनविहिरी कोरड्या पडल्या आहेत. माणसांप्रमाणेच जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.

अशा परिस्थितीत एका टॅंकरचे पाणी हे अपुरे पडत आहे. यावर आम्ही जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थानशी पत्रव्यवहार केला असून, त्यांच्यामार्फत येथे दिवसाला रोज एक खेप पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सरकारकडून एक व देवसंस्थानचा एक असे दोन टॅंकर पाणी मिळाले, तर खानवडीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले.

एकीकडे ग्रामसेवक रावते हे श्री मार्तंड देवसंस्थान यांच्याकडे एका टॅंकरने पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी केल्याचे सांगत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्या वतीने टॅंकर सुरू झालेला नाही. दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या शासकीय टॅंकरवर ‘श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी, मोफत पाणीपुरवठा’ असा फलक लावल्याचे दिसत आहे. 

याबाबत देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com