पुणे रेल्वे स्थानकात पाण्याचा खडखडाट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

पुणे रेल्वे स्टेशनवरील पाण्याचा पुरवठा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून अचानक बंद झाल्याने हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला. सुमारे पाच तास स्थानकावर पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. तसेच स्वच्छतागृहांतही पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे दुर्गंधी पसरली होती.

पुणे - पुणे रेल्वे स्टेशनवरील पाण्याचा पुरवठा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून अचानक बंद झाल्याने हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला. सुमारे पाच तास स्थानकावर पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. तसेच स्वच्छतागृहांतही पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे दुर्गंधी पसरली होती.

रेल्वे स्थानकावर दररोज सुमारे 2 लाख प्रवाशांची ये-जा होते. त्यामुळे स्थानकावर पिण्यासाठी तसेच स्वच्छतागृहात पाण्याची आवश्‍यकता भासते; परंतु दुपारी दोन वाजल्यापासून स्थानकावरील पाणी बंद झाले. प्रवासी अनंत भालेराव म्हणाले, 'कोल्हापूरला जाण्यासाठी दुपारी दोन वाजता पुणे रेल्वे स्थानकावर आलो. पिण्याच्या पाण्यासाठी व्हेंडिंग मशिनजवळ गेलो, तर पाणी नव्हते. त्यामुळे पाणी विकत घ्यावे लागले. स्वच्छतागृहांतही पाणी नसल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. याबाबत स्टेशन मास्तरकडे तक्रार केली.''

याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापकांच्या कार्यालयात विचारणा केली असता, तेथील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, 'पुणे स्टेशनला पाण्याची टंचाई भासत नाही. चार लाख लिटरची टाकी कायम भरलेली असते. गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे शुक्रवारी काही वेळ पाणी नव्हते; परंतु सायंकाळी पुरवठा सुरळीत झाला.'' दरम्यान रेल्वे प्रशासनाने पाण्याचे टॅंकर मागविल्यावर सायंकाळी सातनंतर पाणीपुरवठा सुरू झाला.

Web Title: Water Shortage in Pune Railway Station