टंचाई निवारणासाठी नागरिकांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

पुणे - दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाची कामे करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केल्यावर असंख्य नागरिकांनी सकाळ रिलीफ फंडाकडे संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. अनेकांनी ‘सकाळ’ कार्यालयात येऊन देणगी दिली आहे. 

पुणे - दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाची कामे करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केल्यावर असंख्य नागरिकांनी सकाळ रिलीफ फंडाकडे संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. अनेकांनी ‘सकाळ’ कार्यालयात येऊन देणगी दिली आहे. 

राज्यात गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे चांगला पाऊस झाला असला, तरी ठराविक भागात कायम अल्पवृष्टी होते. त्यामुळे तेथील नागरिकांना जवळपास बाराही महिने पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. सकाळ रिलीफ फंडाने अशी गावे निवडून त्या ठिकाणी जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत. गेल्या वर्षापर्यंत ४४३ गावांत ओढा खोलीकरण करण्यात आले असून, सध्या १४० ठिकाणी हेच जलसमृद्धीचे काम वेगात सुरू आहे. प्रत्येक गावात ओढा खोलीकरणासाठी पोकलेन, जेसीबी आदींचा वापर केला जात आहे. ही यंत्रसामग्री प्रामुख्याने लोकसहभागातून उपलब्ध केली जात आहे. 

पुण्यातील उद्योजक ‘केशव इंजिनिअरिंग सर्व्हिसेस’चे विनायक वाळेकर यांनी केवळ ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या कामासाठी नवे पोकलेन मशिन विकत घेतले आहे. या मशिनच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत पुणे जिल्ह्यातील अनेक गावांत ओढा खोलीकरणाचे काम मोफत करण्यात आले आहे. पोकलेनच्या डिझेलचा खर्च रिलीफ फंडामार्फत केला जात आहे. विविध संस्था, कंपन्या, उद्योगपती हेही सढळ हाताने या कार्यात योगदान देत आहेत. एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी ७५ हजार रुपयांची देणगी काल दिली. त्यांची अट एकच होती. त्यांचे नाव प्रसिद्ध करू नये ! दरम्यान, श्‍याम विश्‍वनाथ वाडवणकर (पाच हजार रुपये), प्राजक्ता प्रमोद नागुलडेली (पाच हजार रुपये), दिलीप जोशी (पाचशे रुपये) यांनीही देणग्या दिल्या आहेत.

आपणही करा मदत!
आपण रोख किंवा धनादेशाद्वारे मदत पाठवू शकता. धनादेश ‘सकाळ रिलीफ फंड’ या नावे काढावा. मदत पाठविण्याचा पत्ता - १) सकाळ रिलीफ फंड, द्वारा- सकाळ, ५९५ बुधवार पेठ, पुणे ४११००२. (दूरध्वनी क्रमांक ०२०- २४४०५५०० ). २) सकाळ, प्लॉट नं. २७, नरवीर तानाजीवाडी, पीएमपीएल बस डेपोजवळ, शिवाजीनगर, पुणे ४११००५. (दूरध्वनी ०२०- २५६०२१०० व ८६०५०१७३६६)

Web Title: water shortage sakal relief fund public response