पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

एकीकडे आज शहरातील पाणीपुरवठा बंद असल्याने दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया गेल्याने महापालिका प्रशासनावर टीका होत आहे. लवकरच एकवेळ पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागणाऱ्या पुणेकरांना तांत्रिक बिघाडामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा नक्कीच त्रास सहन करावा लागणार आहे.

पुणे : मुठा डावा कालवा फुटून सिंहगड रस्त्यावरील अनेक झोपड्या वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज (गुरुवार) पुन्हा एकदा सिंहगड रस्त्यावर तेवढेच पाणी पहायला मिळाले. पण, हे पाणी कालवा फुटीमुळे नाही तर टाकीचा व्हॉल्व्ह बंद झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सिंहगड रस्त्यावर पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ महापालिकेच्या पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व्ह बंद झाल्याने पाणी बाहेर आले. पाण्याचा फ्लो एवढा होता की काही वेळातच पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झाले. त्यामुळे वाहतूक काहीकाळ बंद करण्यात आली. नागरिकांना पुन्हा तो कालवा फुटून रस्त्यावर आलेल्या पाण्याचे चित्र डोळ्यासमोर आले. 

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाहतूक काहीकाळ बंद केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पाण्याचा निचरा झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, एकीकडे आज शहरातील पाणीपुरवठा बंद असल्याने दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया गेल्याने महापालिका प्रशासनावर टीका होत आहे. लवकरच एकवेळ पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागणाऱ्या पुणेकरांना तांत्रिक बिघाडामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा नक्कीच त्रास सहन करावा लागणार आहे.

Web Title: water on singhgad road in Pune