पाण्यासाठी जागरण

संजय बेंडे
सोमवार, 9 एप्रिल 2018

भोसरी - पाणी भरायचंय... पहाटे दोनला झोपेतून उठा..., अशी अवस्था येथील सम्राट अशोकनगरात (डोळस वस्ती) गेल्या दोन वर्षांपासून आहे. या भागात महापालिकेद्वारे पहाटे दोन ते साडेचारदरम्यान पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांसह सर्व कुटुंबांना रात्रीचा दिवस करावा लागतो आहे. पाणीवाटपाचे हे नियोजन गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून, वेळ बदलण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

भोसरी - पाणी भरायचंय... पहाटे दोनला झोपेतून उठा..., अशी अवस्था येथील सम्राट अशोकनगरात (डोळस वस्ती) गेल्या दोन वर्षांपासून आहे. या भागात महापालिकेद्वारे पहाटे दोन ते साडेचारदरम्यान पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांसह सर्व कुटुंबांना रात्रीचा दिवस करावा लागतो आहे. पाणीवाटपाचे हे नियोजन गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून, वेळ बदलण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

सम्राट अशोकनगरमधील पाणीपुरवठ्याच्या वेळेबाबत स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी वंदना विलास डोळस, वंदना दीपक डोळस, श्रद्धा राहुल माघाडे, शोभा डोळस, शीला मधुकर डोळस, मालन डोळस, माधुरी चंद्रकांत डोळस, रेखा सचिन गायकवाड, शैलजा प्रकाश डोळस, सुनंदा रमेश डोळस, कविता विठ्ठल भालेराव, लब्जा सुरेश आपटे, लक्ष्मीबाई मधुकर डोळस आदींनी केली आहे. दिवसभर कष्टाची कामे करायची आणि रात्री पाण्यासाठी जागायचं, यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे महिलांनी सांगितले. वेळेत बदल न केल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. येथील रहिवासी शैला डोळस म्हणाल्या, ‘‘पहाटे दीड-दोन ते साडेचारपर्यंत पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणी भरण्यासाठी रात्रभर जागावे लागते. त्याचा परिणाम दिवसभराच्या कामावरही होतो. महापालिकेने पाणी सोडण्याची वेळ पहाटे सहानंतर करावी.’’

टाक्‍या नसल्याने अडचण
शीतलबाग, सम्राट अशोकनगर, आदिनाथनगरचा काही भाग एकाच जलवाहिनीला जोडलेला आहे. मात्र, शीतलबाग आणि आदिनाथनगरचा भाग सोसायटीवजा असून, त्यांच्या स्वतंत्र टाक्‍या आहेत. पहाटे नळाला येणारे पाणी सोसायट्यांमधील टाक्‍यांमध्ये साठवले जाते. मात्र, सम्राट अशोकनगरातील नागरिकांकडे पाणी साठविण्याची टाक्‍या नसल्याने त्यांची अडचण होत आहे.

गावठाणातील पाण्याचे नियोजन हवे
याबाबत नगरसेवक ॲड. नितीन लांडगे म्हणाले, ‘‘महापालिकेद्वारे पाणीवाटपाचे नियोजन समान होणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. शांतिनगर आणि भोसरी गावठाणातील पाण्याच्या टाकीतील पाणी वाटपाचे नियोजन योग्य केल्यास सम्राट अशोकनगरातील पाणी सोडण्याच्या वेळेची समस्या सुटेल.’’

सम्राट अशोकनगरातील नागरिकांच्या तक्रारीवरून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना बोलावून दोन महिन्यापूर्वीच पाहणी केली आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांची चालढकल सुरू आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहे.
- भीमाबाई फुगे, अध्यक्षा, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी

सम्राट अशोकनगरात दिवसाच्या इतर वेळी पाणीपुरवठा करण्याची ट्रायल येत्या पाच दिवसांत घेण्यात येणार आहे. त्यानंतर या भागांतील पाणी सोडण्याची वेळ बदल्याचा प्रयत्न करू.    
- रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका 

हॉटेलसाठी पहाटे पाणी?
पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, रसाळवाडा, आदिनाथनगर या भागात हॉटेलांची संख्या अधिक आहे. त्यांना पाणीपुरवठा होण्यासाठीच मध्यरात्रीनंतर पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Web Title: Water supply between the two to four in the morning by municipal corporation