पूर्व भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी भामा आसखेड हाच उपाय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पुणे - शहराचा पूर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी भामा आसखेड पाणीपुरवठा योजनाच उपाय ठरू शकते, असा दावा महापालिका प्रशासनाने केला. विस्कळित पाणीपुरवठ्याचे खापर महापालिका प्रशासनाने खंडित वीजपुरवठा आणि जुन्या यंत्रणेवर फोडले.

पुणे - शहराचा पूर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी भामा आसखेड पाणीपुरवठा योजनाच उपाय ठरू शकते, असा दावा महापालिका प्रशासनाने केला. विस्कळित पाणीपुरवठ्याचे खापर महापालिका प्रशासनाने खंडित वीजपुरवठा आणि जुन्या यंत्रणेवर फोडले.

लोहगाव भागातील पाणीपुरवठाप्रश्‍नी नगरसेवक बापू कर्णे गुरुजी यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. या वेळी सुनील टिंगरे, वसंत मोरे, दत्ता धनकवडे, अनिल टिंगरे, नंदा लोणकर आदी नगरसेवकांनी विस्कळित पाणीपुरवठ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या विषयावर पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी उत्तर देताना शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा केवळ भामा आसखेड योजनेमुळेच सुधारेल असा दावा केला. या योजनेचे काम पुढील वर्षी मे महिन्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर पाणीपुरवठा करता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोहगाव परिसराला होळकर जलकेंद्रातून पाणीपुरवठा केला जातो; परंतु तेथपर्यंत पाणी पोचत नाही. जागतिक बॅंकेच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविले जात असले तरी तेथे वीजपुरवठा खंडित होण्याचा परिणाम होतो, असा दावाही त्यांनी केला. ""उन्हाळ्याच्या कालावधीत पाण्याची मागणी वाढते. सध्या नियमितपेक्षा जास्त पाणी महापालिका पुरवीत आहे. लष्कर पाणीपुरवठा केंद्र जुने झाले आहे. तेथे सातत्याने दुरुस्तीची कामे करावी लागतात. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. महावितरणकडून सातत्याने दुरुस्तीची कामे केली जात असल्याने पाण्याच्या टाक्‍या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत किंवा त्या भरण्यास विलंब लागतो, अपेक्षित पातळी न मिळाल्याने पाणीपुरवठा विस्कळित होतो,'' असे उत्तर कुलकर्णी यांनी दिले.

Web Title: water supply bhama aaskhed