पुणे शहरात पाणीपुरवठा विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

उन्हाची तीव्रता वाढल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. त्यातच अपुरा व अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा दिसून आले. मध्यवर्ती भागातील पेठांसह नवी पेठ, दांडेकर पूल, स्वारगेट, पोलिस वसाहत इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय झाली. काही भागांत अर्धा तासदेखील पाणी येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

पुणे - उन्हाची तीव्रता वाढल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. त्यातच अपुरा व अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा दिसून आले. मध्यवर्ती भागातील पेठांसह नवी पेठ, दांडेकर पूल, स्वारगेट, पोलिस वसाहत इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय झाली. काही भागांत अर्धा तासदेखील पाणी येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

गेल्या आठवड्यात डेक्कन, शिवाजीनगर, फर्ग्युसन रस्ता व जंगली महाराज रस्ता परिसरातील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा झाल्याने त्यांनी ओरड केली. याबाबत नगरसेवक आणि पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली, तरी दखल घेतली नसल्याने रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर या भागांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. तो सुरळीत होऊन आठवडा होत नाही तोच आता अन्य भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.

सुरवातीला काही दिवस वेळापत्रकानुसार पाणी आले. त्यानंतर वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. साप्ताहिक देखभाल दुरुस्तीमुळे दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यानंतर शुक्रवारी कमी दाबाने पाणी सोडले जात आहे. त्यानंतरदेखील रहिवाशांना अपुरे पाणी मिळत आहे.

कमी दाबामुळे काही भागांतील इमारतींमध्ये पाणी पोचत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित होत असून, तो सुरळीत करण्यात येत आहे. 
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

दररोज दीड तास पाणी सोडल्यास सर्वांना पुरेसे पाणी मिळेल. मात्र, काही भागांत चार ते पाच तास पाणी दिल्याने इतर नागरिकांना पाणी मिळत नाही. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
- श्रीनिवास सणस, रहिवासी, स्वारगेट

Web Title: Water Supply Disturb in Pune City