पैसे मोजा, भरपूर पाणी घ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी चावीवाल्यांच्या ताब्यात गेली आहेत. शहरातील पाणीटंचाई या चावीवाल्यांसाठी मालामाल करणारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. ‘पैसे मोजले की मुबलक पाणी’ चावीवाल्यांच्या या नव्या फंड्यामुळे त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

पुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी चावीवाल्यांच्या ताब्यात गेली आहेत. शहरातील पाणीटंचाई या चावीवाल्यांसाठी मालामाल करणारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. ‘पैसे मोजले की मुबलक पाणी’ चावीवाल्यांच्या या नव्या फंड्यामुळे त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

परतीचा पाऊस कमी झाल्याने धरणातील साठा वीस टक्‍क्‍यांनी कमी झाला. त्यामुळे शहरात ऑक्‍टोबरपासूनच पाण्यात कपात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहराला दररोज ११५० एमएलडी एवढा पाणीपुरवठा करणार, या भूमिकेवर जलसंपदा विभाग ठाम आहे. तर १३५० एमएलडीने पाणीपुरवठा करावा, याबाबत पालिका आग्रही आहे.

त्यावर जलसंपदा आणि महापालिका यांच्यात आतापर्यंत तीन ते चार वेळा बैठक झाल्या. मुख्यमंत्र्यांपर्यंत पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न गेला. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. परंतु महापालिकेने दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा करण्याचे आणि त्यासाठी वेळापत्रक निश्‍चित करून दिले आहे. परंतु या वेळापत्रकानुसार महापालिकेकडूनच पाणीपुरवठा होत नसल्याचे दिसून आले आहे.

शहराच्या अनेक भागांत अत्यंत कमी दाबाने आणि अर्धा ते एकच तास पाणीपुरवठा होत आहे. तर काही प्रभागात विशिष्ट भागात पाणीपुरवठा सुरळीत असून, दुसरीकडच्या भागात मात्र नळदेखील ओला होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. याबाबत माहिती घेतली असता, पाणीपुरवठ्याच्या नियोजन महापालिकेऐवजी चावीवाल्यांच्या हातात असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी माननीय म्हणजेच नगरसेवक सांगतील तेवढे व्हॉल्व्हचे आटे सोडण्याचे प्रकार घडत आहेत. तर काही ठिकाणी चावीवालेच परस्पर ते ठरवत आहेत. कोणत्या भागाला किती जास्त आटे सोडायचे याचे देखील पैसे त्या चावीवाल्यांना मिळतात. ‘जितकी रक्कम जास्त, तितके पाणी अधिक’ असे चित्र सध्या शहरात बहुतांश ठिकाणी दिसत आहे. एवढेच नव्हे, तर काही सोसायटीधारकांना दरमहा या चावीवाल्यांना पैसे मोजावे लागतात.

चावीवाल्यांच्या या ‘उद्योगा’मुळेच शहरात पाणी असूनही टंचाई असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या चावीवाल्यांवर महापालिका प्रशासन चाप ठेवणार का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष का?
जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह सोडण्यासाठीचे काम निविदा मागवून एका ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून महापालिकेने ठरवून दिलेल्या वेळेत पाणी सोडण्याचे काम केले जाते. असे सुमारे दोनशे ते अडीचशे चावीवाले आहेत. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. व्हॉल्व्ह कमी-जास्त सोडण्याचे काम या चावीवाल्यांच्या हाती असल्यामुळे त्याचा फायदा त्यांच्याकडून घेतला जातो. पैसे मोजले की त्या परिसराचा व्हॉल्व्ह पूर्ण सोडला जातो, असे प्रकार सध्या शहरासह उपनगरात घडत आहेत. हा प्रकार सर्रास सुरू असताना महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील अधिकारीही ‘मौन’ बाळगत असल्याने तेही याच साखळीचा भाग तर नाही ना, अशीही चर्चा आहे. चावीवाल्यांविरुद्ध तक्रार करा नंतर पाहू, असा शहाजोगपणाचा सल्लाही अधिकारी देत आहेत.

दरमहा दोन हजार रुपये आमच्या सोसायटीकडून चावीवाल्याला द्यावे लागतात. तेव्हा आमच्या सोसायटीचा पाणीपुरवठा सुरळीत राहतो. नाही दिले, तर दुसऱ्या दिवसापासून पाण्याची अडचण सुरू होते. त्यामुळे पैसे देण्याशिवाय आमच्यापुढे कोणताही पर्याय राहत नाही.
- रितेश काळे, धायरी

व्हॉल्व्ह सोडण्याचे काम निविदा काढून देण्यात आले आहे. त्यामुळे असे प्रकार चावीवाल्यांकडून होत असतील, तर नागरिकांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालय अथवा महापालिकेच्या पाणीपुरवठ्याकडे तक्रार करावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

Web Title: Water Supply Money Municipal