पाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या पाच किलोमीटर अंतरावरील गावांमधील लोकसंख्येचा विचार करण्यात आला नाही, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी यांनी सांगितले. तेव्हाच, लोकसंख्या, पाण्याची उपलब्धता आणि गरज याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या दोन दिवसांत राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. मात्र, पाणीपुरवठ्यात कपात होणार नाही, असे राव यांनी स्पष्ट केले.

मुळात पाणीसाठ्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला नसल्याचेही राव निदर्शनास आणून दिले. तसेच, प्राधिकरणाच्या निर्देशानुसार कलम 31 ( ब)नुसार शहरासाठी जादा पाणीसाठा मागण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शहराला जादा पाणी देण्याची महापालिका प्रशासनाची मागणी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फेटाळली असून, लोकसंख्येच्या प्रमाणात रोज 1350 ऐवजी 692 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय सुनावणीदरम्यान जाहीर केला आहे. त्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी उमटले. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्तांनी खुलासा केला. राव म्हणाले, 'शहरातील लोकसंख्येला पुरेसे पाणी पुरविण्यासाठी रोज 1350 एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यात प्रति व्यक्ती प्रतिदिन 150 लिटर पाणी देण्यात येते. त्यानुसार वर्षाकाठी साधारणत: 15 अब्ज घन फूट (टीएमसी) पाणी आवश्‍यक आहे.

त्यानुसार शहरीकरणाचे निकष विचार करून सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल. ज्यामध्ये पुणेकरांना पुरेसे पाणी देण्याची मागणी करण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही यासंदर्भात भेट घेण्यात येईल.''

Web Title: Water Supply No Shortage Saurabh Rao