पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा पूर्ववत करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

दिवसाआड पाणीपुरवठा करा, अशी ७० टक्‍के नागरिकांची मागणी असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. नागरिकांना काय वाटते, याबाबत ‘सकाळ’ने प्रतिक्रिया मागविल्या होत्या. त्यामध्ये ८० टक्‍के नागरिकांनी पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली.

पिंपरी -  दिवसाआड पाणीपुरवठा करा, अशी ७० टक्‍के नागरिकांची मागणी असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. नागरिकांना काय वाटते, याबाबत ‘सकाळ’ने प्रतिक्रिया मागविल्या होत्या. त्यामध्ये ८० टक्‍के नागरिकांनी पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली. तसेच कपात हे उत्तर नसून जनजागृती करणे आणि पाण्याचा स्रोत वाढविण्याची सूचनाही केली आहे.

पाणीकपात रद्द व्हावी का?, तुम्हाला काय वाटते? याबाबत शुक्रवारच्या (ता. २) ‘सकाळ’मध्ये वाचकांना आपल्या प्रतिक्रिया कळविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार एक हजाराहून अधिक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. यापैकी ८० टक्‍के वाचकांनी पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली. आलेल्या प्रतिक्रियांमध्ये ३० टक्‍के महिला वाचकांच्या प्रतिक्रिया होत्या. पावसाळ्यात पवना धरणातून पाणी सोडले जात नाही. त्यामुळे धरण भरण्याची वाट न पाहता पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जलवाहिन्या गंजलेल्या असून त्यातून ३५ टक्‍के पाण्याची गळती होते. ती थांबविल्यास शहराला पाणी कमी पडणार नाही, असे निरीक्षण काही वाचकांनी नोंदविले आहे. शहराच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने पाणी कमी पडत आहे. त्यामुळे पाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधल्यास या समस्येवर मात करता येईल, असे काहींचे म्हणणे आहे. पाऊस सुरू असल्याचे धरण दोन दिवसांत भरेल. एकीकडे चोवीस तास पाणी देण्याचे स्वप्न दाखविले जात आहे, तर दुसरीकडे दिवसातील दोन तासही महापालिका पाणी देऊ शकत नाही. आपले शहर ‘स्मार्ट सिटी’ कशी होणार, असा प्रश्‍नही उपस्थित केला. पाणी पूर्ववत करण्यासाठी महापौरांनी १५ ऑगस्टचा मुहूर्त कोठून शोधून काढला, असेही त्यांचे म्हणणे आहे.

केवळ २० टक्‍के वाचकांनी महापौरांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. कपातीमुळे नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळेल, त्यांना बचतीची सवय लागेल, असे काहींचे म्हणणे आहे. मुबलक प्रमाणात पाणी दिल्याने त्याचा अपव्यय करतात. ते थांबणे गरजेचे आहे. तर काहींनी फक्‍त शहरवासीयांचा विचार न करण्याचे आवाहन केले आहे. नदीतील पाणी उजनी धरणात गेल्यावर तेथील नागरिकांची तहान भागणार असल्याचे म्हटले आहे.

रोज पाणी हवे - काटे
पवना धरण ९२ टक्के भरले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा रावेत बंधारा ओसंडून वाहत आहे. तरीही दिवसाआड पाणीपुरवठा होतो. हे खेदजनक अाहे. रोज पाणीपुरवठा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

महापौरांनी राजीनामा द्यावा
पाणी असूनही पुरवठा होऊ न देणाऱ्या महापौरांनी राजीनामा द्यावा. महापौरांचा निर्णय कोणाच्या भल्यासाठी हे जनतेला माहिती आहे.
- रोहित कोरड

पालिकेचे अपयश
धरण वेगाने भरत आहे. पुणे पालिकेनेही कपात मागे घेतली. मग पालिका मागे का? पाणी असूनही नियोजन न करता येणे हे पालिकेचे अपयश आहे.
- आनंद जोशी

उपाययोजना कराव्यात
सोसायटीधारकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे, इतरही उपाययोजना कराव्यात. पालिकेचा निर्णय योग्य. पाणी वाया जात नसून उजनी धरणातच जात आहे. थोडी अडचण सहन करून तहानलेल्यांसाठी पाणी पुढे पाठविले तर बिघडले कुठे.
- डॉ. संदीप बाहेती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water supply in PCMC