चोवीस तास पाणीपुरवठ्याचा प्रोजेक्‍ट गुंडाळला

संदीप घिसे
गुरुवार, 11 मे 2017

यमुनानगरला लागते २० लाख लिटर जादा पाणी

पिंपरी - महापालिकेने यमुनानगरमध्ये राबविलेला २४ तास पाणीपुरठ्याचा पायलट प्रोजेक्‍ट गुंडाळला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यमुनानगरला दोन दशलक्ष लिटर जादा पाणी लागत असून महापालिका निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी दिलेले २४ तास पाणीपुरवठ्याबाबतचे आश्‍वासनही हवेतच विरले आहे. 

यमुनानगरला लागते २० लाख लिटर जादा पाणी

पिंपरी - महापालिकेने यमुनानगरमध्ये राबविलेला २४ तास पाणीपुरठ्याचा पायलट प्रोजेक्‍ट गुंडाळला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यमुनानगरला दोन दशलक्ष लिटर जादा पाणी लागत असून महापालिका निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी दिलेले २४ तास पाणीपुरवठ्याबाबतचे आश्‍वासनही हवेतच विरले आहे. 

महापालिकेचे धोरण
महापालिकेने केंद्र सरकारच्या अमृत योजनेत २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव पाठविला होता. तो सरकारने फेटाळला होता. त्यानंतर प्रकल्पाचे नाव बदलून, सर्वांना समान व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याची योजना सादर केली. त्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीने शहराच्या ४० टक्‍के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला मंजुरी दिली.

पायलट प्रोजेक्‍टमध्ये राजकारण
गेल्या वर्षी सुरवातीला पाऊस कमी झाल्याने पालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा केला होता. मात्र, नंतर चांगला पाऊस झाल्याने २४ तास पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल, अशी यमुनानगरमधील नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, यमुनानगरला २४ तास आणि त्या शेजारील साईनाथनगरला टंचाईवरून ओरड होऊ लागली. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच इच्छुकांनी तक्रारी केल्या. त्यामुळे प्रकल्प गुंडाळल्याची चर्चा आहे.

यमुनानगरमध्ये तळमजला वगळता इतर ठिकाणी पाणी चढत नाही. पाण्यासाठी नागरिकांची खूप हाल व्हायचे. म्हणून पाणीपुरवठा विभागाने २४ तास पाणीपुरवठ्याचा पायलट प्रोजेक्‍ट निवडला. गेल्या काही महिन्यांपासून प्रकल्प बंद आहे. पाणी बचत होत असल्याने प्रकल्प पुन्हा राबवावा.
- सुलभा उबाळे, माजी नगरसेविका

माझ्या कुटुंबात १३ व्यक्‍ती असून दुसरा मजल्यावर राहतो. २४ तास पाणी बंद झाल्यापासून घरात पाणी येत नाही. तळमजल्यावरून पाणी न्यावे लागते. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील परिस्थिती लक्षात घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करावा. 
- सरिता पवार, गृहिणी, यमुनानगर

यमुनानगरमध्ये २४ तास पाणीपुरवठ्यासाठी पायलट प्रकल्प राबविण्यापूर्वी १० दशलक्ष लिटर पाणी लागत होते. प्रकल्पामुळे दोन दशलक्ष लिटर पाण्याची बचत होऊन नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या. प्रकल्पाची अन्य कामे पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर २४ तास पाणीपुरवठा केला जाईल.
- प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग 

२४ तास पाण्याचे फायदे
सतत पाणी असल्याने साठवणूक केली जात नाही
साठवणूक नसल्याने शिळे पाणी फेकून देण्याचे प्रमाण कमी
नेहमीपेक्षा कमी पाण्याचा वापर होतो
जलवाहिनीमध्ये बाहेरील पाणी आत येत नाही
दूषित पाण्यामुळे होणारे आजार कमी होतात
सर्वांना योग्य दाबाने पाणीपुरवठा होतो

यमुनानगरची निवड का?
यमुनानगर उंचावर असल्याने कमी पाणीपुरवठा
इमारतींत पाण्याच्या टाक्‍या नसल्याने सतत तक्रारी
पाण्याच्या सर्वाधिक तक्रारी यमुनानगर परिसरातील

Web Title: water supply planning flop in pimpri