पुण्यातील पाणीपुरवठा आजपासून सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

खडकवासला धरण साखळीत शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत पाणीकपात थांबविली असून, मंगळवारपासून (ता.६) शहरातील सर्वच भागांत सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.

पुणे - खडकवासला धरण साखळीत शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत पाणीकपात थांबविली असून, मंगळवारपासून (ता.६) शहरातील सर्वच भागांत सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. आवश्‍यकतेनुसार शहराच्या काही भागांत दोनदा पाणीपुरवठा केला जाईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी स्पष्ट केले.  

पाण्याचे नियोजन करीत असल्याचे सांगून वडगाव जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यामुळे कात्रज, धनकवडी, कोंढवा आणि सिंहगड रस्त्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. मात्र, पुरेसा पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे आता पूर्ण भरली आहेत. त्यामुळे पाणीकपात थांबविण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. 

महापौर टिळक म्हणाल्या, ‘‘धरणांत पुरेसे पाणी आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र समान पाणी सोडले जात आहे. ज्या भागांत गरज असेल, तिथे दिवसातून दोन वेळा पाणी  सोडले जाईल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply in Pune