एकाच दिवसात पाणीपुरवठ्याच्या दुरुस्तीची कामे

वडगाव जलशुद्धिकरण केंद्र - पुणे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात गुरुवारी व्हॉल्व दुरुस्ती करताना.
वडगाव जलशुद्धिकरण केंद्र - पुणे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात गुरुवारी व्हॉल्व दुरुस्ती करताना.

पुणे - दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवू नका, अशी तंबी पालकमंत्र्यांनी देताच सर्वच जलकेंद्रातील दुरुस्तीची कामे पुणे महापालिकेने गुरुवारी (ता. ७) एका दिवसात आटोपली. तसेच, दुरुस्तीची किरकोळ कामे करताना पाणीपुरवठा बंद ठेवणार नसल्याचेही स्पष्ट केले. एकाचवेळी दुरुस्तीची कामे झाल्याने पुणेकरांना रोज पुरेसे पाणी मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही काही भागांतील लोकांना अपुरे पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. वडगाव जलकेंद्रातर्गंत आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येते. तर देखभाल दुरुस्तीसाठी दर गुरवारी सर्व भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे पुणेकरांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, महापालिका प्रशासनाकडून दुरुस्तीचे कारण पुढे करण्यात येत होते. दुरस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर पालकमंत्री पाटील यांनी आक्षेप घेतला.

तेव्हा कामे करा पण, पुणेकरांना पाणी कमी पडू देऊ नका, अशी सूचनावजा आदेश त्यांनी महापालिकेला नुकताच दिला होता. त्यानुसार यापुढे दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवणार नसल्याचे महापालिकेने जाहीर केले. त्यानंतर आज सर्व जलकेंद्रांतील पाण्याच्या टाक्‍या, जलवाहिन्या, त्यावरील व्हॉल्व्ह बदलण्याची कामे करण्यात आली. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम म्हणाले, ‘‘जलकेंद्राची नियमित देखभाल केली जाते. मात्र, काही महत्त्वाची कामे करताना पाणीपुरवठा बंद करावा लागतो. त्यामुळे गुरुवारी पाणी सोडले जात नाही. मात्र, आता कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे एकाचवेळी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवून कामे केली जाणार नाहीत.’’ दरम्यान, काही भागांत शुक्रवारी (ता.८) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असेही त्यांनी सांगितले.

‘सीपीआर’ कीट खरेदीला स्थायी समितीची मंजुरी
रस्ते अपघातासह पाण्यात बुडणे, विजेचा धक्का, रक्तदाब दरम्यान हृदयाचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना जागेवरच प्राथमिक उपचार देण्यासाठी महापालिका ‘सीपीआर’ कीट उपलब्ध करणार आहे. सार्वजनिक ठिकाणी हे कीट उपलब्ध राहणार असून, ते हाताळण्याबाबत संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, त्यासाठी सुमारे ७८८ कीट खरेदीला स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. 

अपघातांत जखमी झालेले रुग्ण घटनेदरम्यान हृदयाचा त्रास होऊन मृत्युमुखी पडण्याची भीती असते. काही घटनांत मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. अशा घटनांमध्ये वेळेत प्राथमिक उपचार न मिळाल्याने मृतांचे प्रमाण वाढत असल्याचा महापालिकेच्या आरोग्य खात्याचा निष्कर्ष आहे, त्यासाठी ‘सीपीआर’ कीट उपयुक्त ठरणार असून, त्यामुळे काही घटनांत लोकांचे जीव वाचविणे शक्‍य होणार आहे, असे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले. नेमक्‍या कोणत्या घटनेत आणि कशा प्रकारे कीटद्वारे उपचार करायचे, याचे प्रशिक्षण संबंधित कंपनी देणार आहे. त्यात विविध संस्थांचे प्रतिनिधी, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com