झोपायलाच नाही जागा; पाणी साठवायचे कसे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

औद्योगिकनगरी, श्रीमंत महापालिका, स्मार्ट सिटी... अशी बिरुदावली असलेल्या शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांपासून सर्व बाजूंनी वाढत आहे. स्वाभाविकच मूलभूत सुविधा पुरविण्यावर मर्यादा येत आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे पाणीपुरवठा. निष्क्रिय प्रशासन आणि पाण्यामध्येही राजकारण करणारे नेते तसेच टाळूवरचे लोणी खाणारे पदाधिकारी याच्या कारभारामध्ये जनता पाण्यासाठी तळमळत आहे. डोक्‍यावर हंडे, कळशा घेवून वणवण फिरणाऱ्या माता-बहिणी पाहिल्या की स्मार्ट सिटी अन्‌ श्रीमंत महापालिका या संकल्पना शून्य होऊन जातात. पाणी या मूलभूत सुविधेचा मागोवा घेणारी मालिका आजपासून....

तहानलेली ‘स्मार्ट सिटी’ - भाग १
पिंपरी - पिंपरी म्हणजे शहरातील मध्यवर्ती भाग. वैशालीनगर, भारतनगर, गुरुदत्तनगर, भाटनगर, रमाईनगर, आदर्शनगर, मिलिंदनगर, आंबेडकरनगर, बौद्धनगर, गांधीनगर, लालटोपीनगर, यशवंतनगर, विठ्ठलनगर, आनंदनगर अशा झोपडपट्ट्यांचा परिसरही येतो. केवळ या परिसराची मिळून लोकसंख्या सुमारे एक लाखाच्या आसपास आहे. या साऱ्या भागात दिवसाआड पाणीपुरवठा होतो. साहजिकच जिथे झोपायला जागा नाही, तिथे पाणी साठवणूक करायला कोठे असणार? साहजिकच नळाला पाणी येण्याच्या प्रतीक्षेत लोकांना जागरण करावे लागते. प्रशासनाचे म्हणणे आहे, सगळीकडे अनधिकृत नळजोड आहेत. ते तोडायला कर्मचारी गेले की लोक अंगावर धावून येतात. लोक म्हणतात, असा कोणताही प्रकार नाही. आम्हाला अधिकृत जोड द्या, पैसे भरायला तयार आहोत.

गुरुदत्तनगर, नाळेकर चाळ, भारतनगरमध्ये कधी कधी थेंबभरही पाणी मिळत नाही. तासन्‌ तास भांड्यांची रांग असते. येथे जलवाहिन्या टाकलेल्या आहेत; पण पाणी येत नाहीच. हीच परिस्थिती भाटनगर, रमाईनगर, आदर्शनगर, मिलिंदनगरमध्ये आहे. मोरवाडी, लालटोपीनगरमध्ये उंचसखल भाग असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. एमआयडीसी आणि महापालिका प्रशासनाकडून कोट्यापेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. नेहरूनगर, बालाजीनगर दोन-दोन दिवस पाणी येत नाही.

अनधिकृत नळजोड
वैशालीनगरमधील नागरिकांना १९९६ पासून पाणीपट्टी येत नाही. त्यामुळे येथे सगळीकडे अनधिकृत नळजोड आहेत. सध्या झोपडपट्ट्यांमध्ये बहुतांशी घरात आणि दारात नळजोड घेतल्याने येथील सार्वजनिक नळ बंद आहे. मात्र, सगळ्यांना दररोज मुबलक पाणी मिळत असल्याचे चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले. 

गांधीनगरमध्ये दोन महिन्यांपासून जलवाहिनी फुटण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. त्यामुळे अखंडित पाणीपुरवठा होत नाही. हीच परिस्थिती खराळवाडीची आहे. दिवसाआड पाणी पुरविले जात असल्याने नागरिकांना कॅन, ड्रम भरून ठेवावे लागतो. वरच्या मजल्यावर पाणीच चढत नाही.
- मोहिनी कोल्हापुरे, स्थानिक

Web Title: Water Supply Water Storage Home Slum