पाच वर्षापासून रखडले पाण्याच्या टाकीचे काम

मिलिंद संगई
मंगळवार, 3 जुलै 2018

शहराच्या मोठ्या लोकसंख्येला पुरेशा दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी उभारण्यात येणा-या रेल्वे उड्डाण पूलानजिकच्या टाकीचे काम पाच वर्षांचा कालावधी उलटूनही संपतच नसल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
 

बारामती - शहराच्या मोठ्या लोकसंख्येला पुरेशा दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी उभारण्यात येणा-या रेल्वे उड्डाण पूलानजिकच्या टाकीचे काम पाच वर्षांचा कालावधी उलटूनही संपतच नसल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

दुस-या टाकीची कसलीही तरतूद नसताना रिमांड होम शेजारील पाण्याची टाकी नगरपालिकेने एका रात्रीत जमीनदोस्त केली. त्या मुळे शहरातील सर्व योजनेचा ताण नगरपालिकेसमोरील एकाच टाकीवर येऊन पडला. वास्तविक अगोदर नवीन टाकी बांधून त्यावर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करुन मग जुनी टाकी पाडणे गरजेचे होते. मात्र नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा कसलाही विचार न करता नगरपालिकेने रिमांड होमनजिकची टाकी जमीनदोस्त करुन टाकली. 

दरम्यान, रेल्वे उड्डाण पूलानजिकच्या टाकीचे काम सन 2013 मध्ये सुरु झाले. आता टाकीचे काम पूर्ण झाले म्हणून टाकी भरल्यानंतर चार ठिकाणी ती गळते आहे असे लक्षात आल्याने आता पुन्हा त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. 

टाकी बांधण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविले गेले. त्यांनी नगरपालिकेकडे बोट दाखवायच आणि नगरपालिकेने प्राधिकरणाकडे, या खेळात पाच वर्षांहून अधिक काळ उलटूनही नव्या सात लाख लिटर क्षमतेच्या टाकीचे काम अद्यापही पूर्ण झालेल नाही. या टाकीचे काम अर्धवट झालेले असल्याने शहरातील अनेक भागाला पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. 

सात लाख लिटर टाकी बांधण्याच्या कामाला नेमका उशीर कशाने झाला, या वर प्राधिकरण व पालिका दोन्हीकडून कारणांच्या याद्या सादर केल्या जातात, मात्र लोकांना किती मनस्ताप सहन करावा लागला, याचे दोघांनाही फारसे देणेघेणे नाही हे पाच वर्षे हे काम रखडल्याने सिध्द झाले आहे.

Web Title: Water tank work stuck for five years