वाल्हे परिसरात वाड्यावस्त्यांना टॅंकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

वाल्हे - वाल्हे (ता. पुरंदर) येथील पूर्वेकडील वाड्यावस्त्या पावसाने दडी मारल्यामुळे तहानलेल्याच होत्या. मात्र, पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टने नुकतेच पिण्याच्या पाण्याचे दोन टॅंकर सुरू करून तहानलेल्या वाड्यावस्त्यांना दिलासा दिला. त्यामुळे वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अभिनंदन करण्यात आले.

वाल्हेच्या पूर्वेकडील भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अगदीच उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच भेडसावत असतो. त्याचप्रमाणे या भागातील ग्रामस्थांना वापराच्या पाण्याचीही टंचाई भासत असते. परिणामी घरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिकांना पाण्यासाठीची पायपीट हा येथील ग्रामस्थांचा नित्यक्रमच बनला आहे. पाण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. या भागातील सरकारच्या अपुऱ्या टॅंकरमुळे पाण्यावाचून ग्रामस्थांचे होणारे हाल थांबविण्यासाठी नुकतेच वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने पुणे येथील दगडूशेठ गणपती ट्रस्टशी संपर्क साधून या भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत चर्चा केली. चर्चेअंती गणपती ट्रस्टने जय गणेश आपत्ती निवारण अभियान अंतर्गत या भागातील अंबाजीचीवाडी, मुकादमवाडीसाठी दोन टॅंकर त्वरित उपलब्ध करून दिले असल्याचे वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.

या वेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या दोन टॅंकरची बुधवारी वाल्हे ग्रामपंचायतीसमोर सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते पूजा केली. या प्रसंगी माजी सरपंच दत्तात्रय पवार, सतीश सूर्यवंशी, सुनील पवार, दीपक कुमठेकर, कुलदीप पवार उपस्थित होते. दरम्यान, या वेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या टॅंकरचे चालक सुरेश पवार व प्रवीण शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: water tanker water shortage