धायरीत रात्री पाणीचोरी

धायरीत रात्री पाणीचोरी

पुणे - कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांसह त्यांना बळ देणाऱ्या पाटबंधारे खाते आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर पाणीपुरवठादार आणि टॅंकरचालकांनी रात्री पाणीचोरीचा मार्ग शोधला आहे. धायरी परिसरातून अशा प्रकारचे पाणी चोरणाऱ्या टॅंकरचे चित्रीकरण स्थानिक नागरिकांनी केले आहे. त्यामुळे रात्रीही पाळत ठेवण्याची वेळ आली आहे. 

यासंदर्भात कालव्यातून बेकायदा पाण्याचा उपसा करून तो विक्रीसाठी नेलेल्या टॅंकरचे पुरावे ‘सकाळ’च्या हाती लागली आहेत. मात्र आपला माग करीत असल्याचा संशय आलेल्या टॅंकरचालकाने नागरिकांची नजर चुकवून तो दामटण्याचा प्रयत्न केला. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई भासत आहे. त्यातच धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. तरीही, कालव्यातून राजरोसपणे पाणी चोरी होत असल्याचे ‘सकाळ’ने उघडकीस आणले आहे. त्याची दखल घेत पाणीपुरवठादार, टॅंकरमालक, चालकांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत. त्यापाठोपाठ अशा घटनांना कारणीभूत असलेल्या जबाबदार यंत्रणातील अधिकारी-कर्मचारीही आता रडावर आले आहेत. त्यामुळे पाणीचोरी थांबण्याची आशा होती. प्रत्यक्षात मात्र कालव्यातून पाण्याचा उपसा करण्याची वेळ बदलून ती रात्रीच्या वेळी म्हणजे, दहानंतर टॅंकर कालव्याच्या दिशेने येत आहेत. त्यानंतर सोयीनुसार पाण्याचा भरणा करून ते बाहेर सोडण्यात येत असल्याचे बुधवारी रात्री उघड झाले.

बेकायदा टॅंकरचालकांनी बांधकाम व्यावसायिकांशी करार केला असून, चढ्या भावाने हवे तेवढे आणि हवा तेव्हा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी टॅंकरचालकांनी घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे टॅंकरचालकही आपली ‘पत’ टिकविण्यासाठी वाटेल तो मार्ग शोधत आहेत. 

या भागात गेली अनेक वर्षे पाणीचोरी होत आहे. परंतु कारवाईच्या भीतीमुळे आता काही जण रात्रीच्या वेळी टॅंकर भरत आहेत. मुळात या लोकांना अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याने हे प्रकार घडत आहेत. पूर्ण पाहणी पथक नेमण्याची  गरज आहे. 
- संकेत येवलेकर, रहिवासी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com