पाण्याअभावी जळताहेत मोशी गायरानातील झाडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

पिंपरी - मोशी कचरा डेपो आणि दगड खाणी या दरम्यानच्या गायरान जमिनीवर लावलेली झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. ही झाडे आम्ही लावलेली नसल्याचे महापालिकेच्या उद्यान आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, काही वर्षांपूर्वी या जागेवर महापालिकेने व दरवर्षी पावसाळ्यात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी वृक्षारोपण केल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जळणाऱ्या झाडांना पाणी घालायचे कोणी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

मोशी कचरा डेपोलगत सुमारे २५० एकरचे गायरान आहे. त्या वेळी या ठिकाणी सफारी पार्क करण्याचे नियोजन झाले. त्यासाठी महापालिकेने वृक्षारोपण केले होते. या गायरानात दरवर्षी पावसाळ्यात विविध संस्थांतर्फे वृक्षारोपण केले जाते. वाढलेली झाडे पाण्याअभावी ती जळत आहेत. त्याकडे पालिका प्रशासन, उद्यान विभाग व पर्यावरण विभागाचेही दुर्लक्ष झालेले आहे.

मोशी गायरान परिसरात महापालिकेने काही वर्षांपूर्वी वृक्षारोपण केले. विविध संस्था, संघटनांतर्फे दरवर्षी पावसाळ्यात येथे वृक्षारोपण केले जाते. या झाडांना पाणी घालण्याची व्यवस्था महापालिकेने करायला हवी.
- चंद्रकांत तापकीर, अध्यक्ष, नागरी कृती समिती, मोशी

मोशी गायरानात महापालिकेने खूप वर्षांपूर्वी झाडे लावली आहेत. ती मोठी झाल्याने त्यांना पाण्याची आवश्‍यकता नाही. नवीन वृक्षारोपण आम्ही केलेले नाही. पर्यावरण विभागाने ही झाडे लावली असावीत. झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी पर्यावरण विभागाची आहे.
- सुरेश साळुंखे, अधीक्षक, उद्यान विभाग, महापालिका

आम्ही कचरा डेपोच्या आतील बाजूस झाडे लावलेली आहेत. त्यासाठी सिंचन व्यवस्था केलेली आहे. मोशी गायरानात आम्ही झाडे लावलेली नाहीत. त्या झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी आमची नसून, उद्यान विभागाची आहे.
- संजय कुलकर्णी, पर्यावरण विभाग, महापालिका

Web Title: water tree garbage depo stone mine