अंकुरलेल्या बिजांच्या रक्षणासाठी..!

ज्ञानेश्वर रायते
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

बारामती - डिसेंबरमध्येच तालुक्‍यात १० टॅंकर सुरू करावे लागले, मग पावसाळ्यात ५५ मिमी पाऊस झालेल्या भागात झाडांची अवस्था सांगायलाच नको; पण या आपत्तीला इष्टापत्ती मानून वनखाते सरसावले... नवी कल्पना जन्माला आली आणि सगळीकडे झाडाच्या मुळाशी प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या दिसू लागल्या. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या सलाईनमुळे वनविभागाच्या हद्दीतील २४ हजार रोपे ‘तगली’!

बारामती - डिसेंबरमध्येच तालुक्‍यात १० टॅंकर सुरू करावे लागले, मग पावसाळ्यात ५५ मिमी पाऊस झालेल्या भागात झाडांची अवस्था सांगायलाच नको; पण या आपत्तीला इष्टापत्ती मानून वनखाते सरसावले... नवी कल्पना जन्माला आली आणि सगळीकडे झाडाच्या मुळाशी प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या दिसू लागल्या. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या सलाईनमुळे वनविभागाच्या हद्दीतील २४ हजार रोपे ‘तगली’!

तालुक्‍यातील उंडवडी, सोनवडी, शिर्सुफळ, पारवडी, कन्हेरी, पिंपळी, सोनकसवाडी व मुढाळे या आठ वनपरिक्षेत्रांत जून महिन्यात वनखात्याने पावणेदोन लाख रोपे लावली. दुर्दैवाने यावर्षी अनेक ठिकाणी अवघा ५५ ते ६० मिमी पाऊस पडला, तो सगळी रोपे जगवायला पुरेसा नव्हता, २० टक्‍क्‍यांच्या आसपास रोपे जळाली. मग वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी उरलेल्या रोपांसाठी कल्पना आखली.

ज्या गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरचा आधार घ्यावा लागला, तेथे वन विभागाने केलेला ‘सलाईन’चा प्रयोग झाडे जगवायला पुरेसा ठरला. गेले दीड- दोन महिने वन खात्याचे कर्मचारी मिळतील तेथून प्लॅस्टिकच्या बाटल्या आणत आहेत. बाटलीच्या टोपणास छिद्र पाडून त्यात सुतळी घालून बरोबर रोपाच्या मुळापाशी सोडली जाते. बाटली उपडी करून जवळपास पाऊण भाग मातीत बुडेल, अशा रितीने गाडली जाते. वरचा भाग अर्धवट कापून पाणी भरण्यास व्यवस्था केली जाते. हे पाणी थेंब, थेंब पद्धतीने आठ ते दहा दिवस पुरते. येथे चिंकारा हरणांची संख्या मोठी आहे. त्यांना पिण्यासाठी स्वतंत्र पाणवठे केले आहेत. सध्या उंडवडी- सोनवडी, शिर्सुफळ व पारवडीत मिळून २४ हजार रोपांना हे सलाईन सुरू आहे. कन्हेरी, पिंपळीत पूर्वी वनखात्याच्या हद्दीत अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या पाण्याच्या स्त्रोताचाच वापर केला जातो. त्यामुळे तेथील रोपे सुस्थितीत आहेत. अजून लाखभर रोपांसाठी बाटल्या गोळा केल्या जात असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पाण्यासाठी मदतीची अपेक्षा
या संदर्भात वनपरिमंडळ अधिकारी अमोल पाचपुते म्हणाले, ‘‘एका बाटलीतील पाणी रोपांना २० दिवस जगवेल, अशी आशा आहे. मात्र आता पाण्याची टंचाई आम्हालाही जाणवू लागली आहे. आम्ही प्रयत्न केला, मात्र त्याला आता मर्यादा पडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे बारामती शहर व तालुका परिसरातील औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था जर पुढे आल्या आणि त्यांनी पाण्याची व्यवस्था केली, तर या वन परिक्षेत्रातील रोपे नक्कीच या उन्हाळ्यातही तग धरतील.’’

Web Title: Water Tree Security