#PMCIssue पुणे का तुंबते?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

पावसामुळे ओढे-नाले, पावसाळी गटारे तुंबून रस्त्यांनाच ओढ्या-नाल्यांचे स्वरूप येऊन लोकांना जीव गमवावा लागला तरी, रस्त्यांवर पाणी का तुंबत आहे, हे पाणी वाहून का जात नाही, या प्रश्‍नाचे उत्तर महापालिकेलाही सापडेनासे झाले आहे.

पुणे - पावसामुळे ओढे-नाले, पावसाळी गटारे तुंबून रस्त्यांनाच ओढ्या-नाल्यांचे स्वरूप येऊन लोकांना जीव गमवावा लागला तरी, रस्त्यांवर पाणी का तुंबत आहे, हे पाणी वाहून का जात नाही, या प्रश्‍नाचे उत्तर महापालिकेलाही सापडेनासे झाले आहे.

दुसरीकडे मात्र, पावसाळी गटारांत कुठेच गाळ नाही; रस्त्यावरच्या पाण्याला वाट करून देण्यासाठी दुरुस्ती केली जात असल्याचा दावा महापालिका करीत आहे. त्यामुळे खरोखरच ही गटारे आहेत आणि त्यांच्या देखभालीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो का, हेही प्रश्‍न अनुत्तरीतच आहेत.

पावसाळ्यात रस्त्यांवरील पाण्याचा निचरा होत नसल्याने वर्दळीच्या रस्त्यांसह लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरून लोकांचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या घटना घडत आहेत. मात्र या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर जुन्या आणि तुंबलेल्या ८०० किलोमीटर लांबीच्या पावसाळी गटारांची व्यवस्था असल्याचे महापालिका सांगत आहे. तसेच त्यांच्या देखभालीसाठी वर्षाला साधारणपणे सहा कोटी रुपये खर्च केल्याचा हिशेब महापालिका देत आहे. प्रत्यक्षात मात्र या गटारांमधील केवळ गाळ काढण्यात येत असल्याचे महापालिकेचे काही अधिकारी सांगत आहेत. पावसाळ्याआधी गटारांची साफसफाई केली असून, रस्त्यांवर पाणी साचणार नाही, असा दावा महापालिकेने केला. मग, जेमतेम पावसात रस्त्यांवर इतके पाणी का साचते, याचे नेमके उत्तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगता येत नाही. 

नाल्यांचा मुख्य प्रवाहच बदलण्यात आलेला आहे. पावसाळी गटारांची उंची ही रस्त्याच्या उंचीच्या वर असल्याने रस्त्यावरील पाणी चेंबरमधून गटारामध्ये जात नाही.
- रमेश बोतालजी, निवृत्त अधिकारी, महापालिका 

 पावसाळी गटारांतील गाळ पावसाळ्याआधी आणि त्यानंतरही काढला जातो. त्यातील चेंबरची दुरुस्तीही केली जाते. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचणे अपेक्षित नाही.
- शंतनू गोयल,  अतिरिक्त आयुक्त, महापालिका

८५८ किलोमीटर - पावसाळी गटारांची लांबी 
३० किलोमीटर  - काम सुरू असलेल्या गटारांची लांबी 
८ कोटी -  वर्षाला गटारांचा देखभाल खर्च 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: waterlogged in Pune due to heavy rain