पाणीपुरवठा योजनांना आता सौरऊर्जेचे बळ!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

शेटफळगढे - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत समाविष्ट नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आता सौरऊर्जा पद्धतीचा वापर केला जाणार आहे. पाणी योजना वीजबिल थकबाकीमुळे बंद पडू नयेत, यासाठी पाणीपुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फायदा कमी उत्पन्न असलेल्या छोट्या ग्रामपंचायतींना होणार आहे. 

सध्या सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विविध योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहेत. मात्र या योजनांसाठी विद्युत पंप हे वीजपुरवठ्यावर कार्यान्वित केलेले असतात. त्यामुळे ग्रामपंचायतीचा सध्या पाणी योजनेच्या एकूण खर्चाच्या ४० ते ५० टक्के खर्च हा विद्युत देयकावर होत आहे. अशातच ग्रामपंचायतींना हा खर्च पाणीपट्टीच्या वसुलीतून भागवावा लागतो; परंतु ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी आकारलेल्या पाणीपट्टीची वसुली वेळेवर होत नाही. त्यामुळे वीजबिले वेळेत न भरल्याने अशा पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे या योजना बंद पडतात. परिणामी, या योजनेवर झालेला सरकारचा कोट्यवधींचा खर्च वाया जातो. म्हणूनच यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांकरिता सौरऊर्जा पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना  पाणीपुरवठा विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी २७ डिसेंबर रोजीच्या शासकीय निर्णयाच्या आधारे जिल्हा परिषदांना दिल्या आहेत. यानुसार आता या योजनेअंतर्गत दहा अश्‍वशक्ती क्षमतेपर्यतच्या नळ पाणीपुरवठा योजनांकरिता सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे.

Web Title: Watersupply Scheme Solar Power